Sunday, December 02, 2007

भाषा आणि लैंगिक भेदभाव

काल सायंकाळी बायकोबरोबर घराजवळच्याच एका मॉल मध्ये गेलो होतो. तिथे जेवणाचा आस्वाद घेताना शेजारच्या टेबलाकडून एक दोनेक वर्षाची (माझ्यामते) मुलगी (माझ्यामते) धावत आली आणि आमच्या टेबलाशेजारी उभी राहिली. दिसायला एकदमच गोड होती आणि अमेरिकन असूनही आमच्याकडे बघून अगदी हसत खिदळत होती. नाहीतर बहुतांश अमरू बाळे एकदम गोबरी गोबरी पण मख्ख असतात. ट्रेनच्या डब्यात अमरू बाळ असेल तर त्याच्या आई वडिलांखेरीज कुणालाही फारसे कळत नाही पण देसी किंवा चायनीज बाळ असेल तर ते शेजारच्या डब्यात पण कळते.

असो, तर सांगायचा मुद्दा हा की ही गुंड मुलगी आमच्या शेजारी येऊन उभी राहिली आणि आम्ही तिची सोबत एंजॉय करत होतो. एवढ्यात तिचा बाप (माझ्यामते) कुठूनसा आला आणि त्याने अमेरिकन शिष्टाचाराप्रमाणे त्या मुलीच्या वतीने 'एक्स्क्यूज अस' म्हटले. तोही हसतमुख होता त्यामुळे आम्हाला फारसे ओशाळल्यासारखे झाले नाही. इथे देशातल्याप्रमाणे लहान मूल दिसले आणि तुम्ही १ मिनीट थांबून सहज खेळलात असे करता येत नाही, म्हणजे सभ्यपणाचे समजत नाहीत. त्या मुलाचे आई-बाप तुमच्याकडे 'हा मायकेल जॅक्सन पंथातला तर नाही' अशा नजरेने बघतात. आता एवढे सगळे घडल्यावर ती मुलगी किती गोड आहे हे तिच्या बापाला सांगणे ओघाने आलेच. आणि यावेळी गाडी लिंगभेदावर अडकली - ती खरच मुलगीच आहे ना, की मुलगा (की अजून काही चा प्रश्न तूर्तास बाजूला ठेवू). माझ्या तोडक्या मोडक्या इंग्रजीला ताण देऊन 'तो' किंवा 'ती' यांचा उल्लेख टाळून वाक्य बनवायचा प्रयत्न केला पण छे! बर त्या बापाला विचारावे की ही मुलगी आहे की मुलगा, तरी जरा कसेनुसेच वाटते. शेवटी एक स्माइलसे मामला निपट दिया.

आता तो/ती गोड होता/होती सांगायला लिंग माहित असण्याची काय गरज होती. पण नाही, ते माहित असावे लागते. अबक आंबा खातो/खाते हे सांगायला अबक चे लिंग माहित असावे लागते. अबक ला शाळेत प्रवेश घेताना जात दाखवावी लागते तशातलाच प्रकार. अबक दूध पितो या वाक्यात अबक पुंलिगी असल्याचे तर कळते पण अबक कुत्रा, बोका की गणपती यांपैकी काय ते कळत नाही. म्हणजे भाषेला पुंलिंग स्त्रीलिंगी मध्ये भेद करण्याची गरज इतर गोष्टींहून जास्त वाटते. आहे की नाही आश्चर्य. भाषा भाषांमध्ये हा फरक थोड्याफार फरकाने जाणवतोच.

आता भाषा-भाषांच्या गमती बघा. मराठीमध्ये तो/ती पिझ्झा खातो/खाते, म्हणजे सर्वनाम आणि क्रियापदात भेदभाव. पण तेच नकारार्थी वाक्यामध्ये तो/ती व्यायाम करत नाही म्हणजे नकारार्थीसाठी जास्त समानता. हिंदीमध्ये 'वह चारा खाता/ती है और रबडी नहीं खाता/ती' म्हणजे सर्वनामात किंवा होकारार्थी नकारार्थी मध्ये फरक नाही पण क्रियापदात आहे. इंग्रजीत 'ही/शी ड्रिंक्स बीअर बट डझ नोट ड्रिंक वॉटर' म्हणजे सर्वनाम सोडून बाकी सगळे तसेच (टल्ली). फ्रेंच मध्ये म्हणे सर्वनाम, विशेषण, क्रियापद सगळेच बदलते.

कदाचित हे फरक त्या त्या समाजाचा स्त्री पुरुषांकडे बघण्याचा दृष्टीकोन दाखवतात. हजारात एक संदर्भ असा असतो की ज्यात स्त्री पुरुष फरक कळेल. जसे - अबक गरोदर आहे. त्यासाठी सरसकट सगळ्या क्रियापदांना वेगळे वागवणे थोडे अचंबाकारक आहे. अर्थात याचे श्रेय बऱ्याच वर्षांपूर्वी ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्या भाषा बनवल्या त्यांना जायला पाहिजे. असेही म्हणता येईल की जेव्हा भाषांचा उगम झाला तेव्हा स्त्री पुरुष यांच्या संबंधांशी निगडित क्रिया आणि अन्नशोध यांचाच प्रभाव असल्याने 'हजारात एक' च्या ऐवजी 'दोनात एक' असेल. पण विकसित समाजातही असा बदल दिसतो. जसे 'स:/सा कन्दमूलानि खादति' या फक्त सार्वनामिक बदल असणाऱ्या भाषामातेच्या पोटी 'तो/ती भाकरी खातो/खाते' एवढा मोठा फरक असणारी भाषा जन्मली. या एका फरकात त्या काळच्या सामाजिक परिस्थितीमधील बदलाचा बराच मोठा प्रभाव जाणवतो.

तर एकूण काय, उगीच अनोळखी माणसांच्या पोरांना 'गोड' वगैरे म्हणण्याच्या भानगडीत पडू नये हेच खरे.

Sunday, November 18, 2007

चकवा

का असे घडते इथे, कळले कधी का ना मला
मार्ग जो चोखाळला त्याने दिला चकवा मला

पौर्णिमेच्या चांदण्याची पाहतो का वाट मी
द्वादशीचा चंद्रही नाही कधी दिसला मला

वाळवंटी वाढलो अन् सागराला भेटलो
पोहणे सोडाच, ना आले कधी भिजता मला

रूप बदले, रंग बदले मी स्वत:ला शोधतो
आरश्याचा चेहरा म्हणतो कधी सरडा मला

चपलता आता पुरे 'ओंकार' पळण्या अंत ना
झाकुनी डोळे उभा, आतातरी पकडा मला

ओंकार कर्‍हाडे

प्रकाशित मनोगत दिवाळी अंक

Sunday, August 19, 2007

गूगर्लशी लग्न

असं वाटायला लागलेय की गूगर्लशी माझे लग्न झालेय. जबरदस्ती नाही पण राजी खुशीने पण नाही. बालविवाह म्हणावा तर तसे पण नाही कारण आजकाल लहान लहान कार्टीपण मला अंकल म्हणायला लागली आहेत. पुनर्विवाह म्हणावा तर तोही नाही कारण माझ्या बायकोची काहीच हरकत नाहीये - गूगर्लला; पुनर्विवाहाला नाही. तसे म्हटले तर तिचेही झालेय. आणि वाचकांपैकी अनेक मंडळीपण, बोटातल्या अंगठीशी खेळत होकारार्थी माना डोलावत असतील.

लग्न झाल्यावर जी पहिली गोष्ट जाते ती म्हणजे प्रायव्हसी. दोन जीव जेव्हा पावणे दोन, दीड, सव्वा असे हळू हळू तन मन धनाने एक होत असतात तेव्हा प्रवास सोपाच असेल असे नाही. डोक्याला डोके भिडते जिथे,... तिथे टेंगुळ पण येऊ शकते. प्रेमविवाहात कदाचित जास्त सोपे असेल कारण त्यात सुई टोचण्या आधी प्रेमाचे स्पिरिट लावलेले असते, पण स्पिरिट किती पटकन उडून जाईल हे कुणी सांगा. पण या लग्नात हा प्रवास अगदीच अलगद होतो.

गूगर्ल शोधावर सर्वात आधी आम्ही फिदा होतो. ०.००२ सेकंदात ३४५२३ शोध. वा वा.. ! जे टाइप करायला आम्ही १० सेकंद घेतले त्याचा शोध एवढ्या लवकर. भलतीच कामसू हो! मग आम्ही भिका मागून मागून गूगर्ल मेल वर खाते उघडतो. खाजगी, सामाजिक, आर्थिक अशी आमची सगळी पत्रे तिला देतो. ती लाडिकपणे म्हणते - "मी ना... तुमची सगळी येणारी जाणारी पत्रे वाचेन पण त्यांचा उपयोग फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच करेन... मग देता ना परवानगी". आम्ही बेधडकपणे हो म्हणतो आणि पत्रांबरोबर तिने फुकट आणलेल्या आमच्या आवडत्या (म्हणजे तिच्याच आवडत्या हो...) जाहिराती बघतो. गूगर्लला मराठी कळत नाही पण तरी ती पत्रे वाचते आणि बिनधास्त काहीच्या काही जहिराती माथी मारते. एरवी, असले नसते उद्योग करणारीने चांगल्या शिव्या खाल्ल्या असत्या पण आम्ही म्हणतो वा काय हुशार आहे ही. "प्रेम असते आंधळे, बहिरे मुके, वेडे पिसे" याचाच प्रत्यय आम्ही घेत असतो पण तोही नकळत.

प्रत्यक्ष भेटण्याचा आम्हाला भारी कंटाळा म्हणून गूगर्ल आमचे निरोप पोहोचवते आणि आणते. गूगर्ल म्हणते "तुम्ही किनई, विसराळूच आहात" आणि आमच्या दिनदर्शिकेचा ताबा घेते. आमची कागदपत्रे हरवतील या भीतीने सांभाळते. आमच्या मनातले वदवून घेऊन ब्लॉगरवर प्रकाशित करते. आमची छान छान छायाचित्रे, चलचित्रे इ. पाहिजे त्या लोकांपर्यंत पोहोचवते. मित्रांना शोधते, भेटवते. रस्ते शोधते. गुंतवणुकीची माहिती सांगते. बातम्या सांगते. वस्तू शोधून विकत घेऊन घरी पोहोचवते. आम्ही शास्त्रज्ञ झालो तर पेपर्स पेटंट्स हुडकते, डॉक्टर झालो की पेशंट्स हुडकते. थोडक्यात म्हणजे आमच्यासाठी काय वाट्टेल ते करते. तेही विनातक्रार आणि फुकट. आम्ही तिला राब राब राबवतो आणि मग एके दिवशी शोध लागतो की आम्ही तिच्यावर पार अवलंबून झालो आहोत.

अशा लग्नाला काय म्हणायचे. आमचे चालणे, बोलणे, वागणे सगळेच तिला माहित आहे पण तिच्या अस्तित्वाचा शोध आम्हाला आता लागतोय. तसा आमचा तिच्यावर विश्वास नाही अशातला भाग नाही पण आहे म्हणायला आम्ही तिला फारसे ओळखतच नाही. आम्हाला वाटते की ती आमच्या तालावर नाचते पण खरेतर आमच्या तालाचा एकन् एक ठोका तिला माहित झालाय. आजकाल ती आम्ही न सांगताच नाचते पण आणि आम्ही कौतुकही करतोय.जगभरच्या असंख्य लोकांचे ताल हिला माहित आहेत आणि त्यावर नाचण्याची किमया हिला जमतेय; आणि हीच बाब तर खटकतिये. ही जगवधू बनतियेउगीचच पूर्वीच्या काळी असलेल्या विषकन्या वगैरेंची आठवण झाली. राजांना मोहवून त्यांच्याकडून गुप्त माहिती उकळणे आणि मग 'खल्लास'. बाप रे!!!

चला, आता मी रजा घेतो. या सुविधेला किती उपभोगायचे आणि मग किती भोगायचे ते तुम्हीच ठरवा. बाकी माझा लेख पहा माझ्या गूगल ब्लॉग वर http://omkarkarhade.blogspot.com/

Tuesday, June 19, 2007

सुट्टीचे प्लॅनिंग

सुट्टी!! लहानपणीपासून आतापर्यंत केवढया सुट्ट्या आल्या आणि संपल्या पण मला आठवते ते म्हणजे सुट्ट्यांचे 'प्लॅनिंग'. अचाट, अफाट, सुसाट अशा शेकडो टकारांती योजना आम्ही बनवत राहिलो आणि मी तरी अजूनही बनवत आहे. आजच्या पिढीला आधी हे सांगायला हवे की सुट्टीचे प्लान म्हणजे चित्रकलेचा वर्ग, कराटेचा वर्ग, व्यायामाचा वर्ग आणि वर्गमुळात काही नाही असा नसायचा. आणि हापूसच्या आंब्याला लाजवेल एवढ्या चवीने हा चाखला जायचा. परीक्षा जवळ आलेल्या आहेत, अभ्यासाची बोंब लागली आहे, सर्वविषय-वासनांचा वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्याग झालेला आहे, कोणते धडे यावेळी मानगुटीवर बसले आहेत हे शोधण्याची धडपड चालू आहे अशी परिस्थिती. नापासांची चिंता करणार्‍या चाटेंचे दर्शन घ्यावे लागण्याइतपत वाईट अवस्था नसली तरी वर्गातली थोडी अब्रू जपणे तर भाग होतेच. आता टवाळक्या पुरे, आता फक्त अभ्यास. अर्जुनाच्या एकाग्रतेने मी पोपटरूपी अभ्यासावर नेम धरायचो. अभ्यास एके अभ्यास. माझ्या त्या एकाग्रतेने आणि निष्ठेने इंद्रालाही आपले स्थान डळमळीत झाल्यासारखे वाटायचे बहुदा. आणि लगेच 'सुट्टी' नामक अप्सरेची माझ्या बालमनाला भुरळ घालण्याच्या कामी नियुक्ती व्हायची. घरात, रस्त्यात, शाळेत, मैदानात कुठेही ही अप्सरा प्रकटायची आणि आईचा राग, रस्त्यातला खड्डा, सरांचा खडू किंवा एखादे जोरदार "आउट" तिला बाद करेपर्यंत ती पिच्छा पुरवायची.

मनाला भुलवणारे सुट्टी रंग तरी किती वेगवेगळे. कधी आई, बाबा, तहान, भूक इ.इ. सगळे थोपवून अख्खा दिवस खेळायला मोकळा. त्यात पूर्णवेळ माझी बॅटिंग चालू आहे. मी तडातड फटके मारतोय आणि सीमापार गेलेला चेंडू इतर मुले विनातक्रार आणताहेत. इमारतींच्या काचा चेंडूप्रूफ झाल्यात आणि खालच्या मजल्यावरचे वसकणारे पिल्ले अंकल आंटी आमचे जप्त केलेले सगळे चेंडू परत करून कौतुकाने खेळ बघताहेत. वा वा वा! किती मजा. कधी समोरच्याला संधी न देता कॅरमच्या सगळ्या सोंगट्या मी घालवतोय तर कधी पतंगाने वटवाघुळांना पळवतोय. हे जरा विचित्र वाटतेय ना पण लहानपणी माझ्या सुट्टीच्या प्लान मधे ही एक अजब गोष्ट नेहमी असायची. त्याचे असे होते की आमच्या इमारतीवरून रोज मावळतीनंतर संधिप्रकाशात वटवाघुळांचा मोठा थवा (?) पश्चिमेकडून पूर्वेकडे उडत जायचा. पतंगाने वटवाघुळांना भिववायचा मी बराच प्रयत्न करायचो पण हे बेटे कधी घाबरतील तर शप्पथ. दिवस मावळल्यावर वारे पण पडायचे आणि पतंगही त्यामुळेही बेत फसायचा. याशिवाय विज्ञानाचा अभ्यास करताना आमच्या बालवैज्ञानिकामधला बाल झोपायचा आणि वैज्ञानिक एडिसनने लावले नसतील एवढे दिवे लावायचा.

सुट्टीचे प्लानिंग असे झोपेत जागेपणी उठता बसता चालायचे. शहाण्या मुलासारखा रोज लवकर उठून व्यायाम करायचा असे संकल्पही व्हायचे. रात्र थोडी सोंगे फार अशी प्लानिंगची गत होते ना होते तोच परीक्षांचा दिवस उजाडायचा. घोडा मैदान दिसताच सुट्टी आमची रजा घ्यायची. अभ्यासाची अन् परीक्षांची रणधुमाळी चालू झाली की तहान भूक हरपून मी युद्ध करायचो. भरपूर वेळ असला तर खुलेआम मैदानात नाहीतर हा प्रश्न ऑप्शनला टाक, तो धडा गाइड मधून वाच असा गनिमी कावा वापरायचा. भवानीमातेच्या आशीर्वादाने कधी तोंडघाशी पडू दिले नाही. पुन्हा एखाद्या आठवड्यात एवढा अभ्यास केल्यावर एकदम ज्ञानी झाल्याचा साक्षात्कार व्हायचा आणि पेपर चांगला गेल्यावर विषय आवडू बिवडू लागायचा. घरी पण जरा जास्तच लाड चालू असायचे परीक्षेच्या काळात. कधी नव्हे ते बाळ अभ्यास करतोय तर जेवण खाण एकदम बसल्या जागी, अभ्यासाच्या खोलीच्या आजूबाजूला खास शांतता. वा वा...! अशा प्रकारे परीक्षा संपत आली की अभ्यासाबद्दलचे प्रेम भलतेच जागृत व्हायचे. आणि एके दिवशी परीक्षा संपायची.

आजवर मला कधीही कळले नाहिये का पण आजवर परीक्षेच्या नादात सुट्टीचे प्लानिंग पार धुऊन निघालेय. हम ये करेंगे वो करेंगे म्हणणारे नेते कसे निवडून आले की सुस्तावतात तसे परीक्षा झाल्यावर व्हायचे. भरपूर झोपण्याचा पहिला प्लान पहिल्याच दिवशी मोडीत निघायचा. गजर वाजण्याआधीच जाग. दर परीक्षेनंतर त्या परीक्षेचे सामान आवरणार्‍या आईने शेवटच्या परीक्षेचा ढीग आमच्यावर सोपवलेला. कालपर्यंत आवडणार्‍या अभ्यासाचे आज दर्शनही नकोसे होत असताना त्या ढिगाकडे ढुंकूनही पाहणे नकोसे झालेले असायचे तेव्हा तो आवरणे हे अगदीच अप्रिय होऊन जायचे. गावी जाणे हा एकमेव प्लान तिकिटे काढून झाल्याने निश्चित असायचा पण त्यालाही पुष्कळ अवकाश असायचा.

एकूण काय तर पहिलाच दिवस अगदी डब्बा व्हायचा आणि सुट्टीपेक्षा प्लानिंगच बरे असे म्हणावे वाटायचे.

Thursday, June 07, 2007

उद्या

का 'उद्या'साठीच जागा 'आज'ला नाही कुठे
काळ वाहे, धावुनी त्या गाठला नाही कुठे

रोजच्या काबाडकष्टा ज्या 'उद्या'ची प्रेरणा
रम्य अन् असतो उद्या, तो भेटला नाही कुठे

कर्म करण्याचाच प्रण केला, फळे ना चाखली
वृक्ष तो वठला तरीही, छाटला नाही कुठे

गुंतलो, हा खेळ कसला, खेळवे ना सोडवे
का कधी हा द्यूतक्रीडा वाटला नाही कुठे?

हे प्रभो, तू घेतला का हात होता अखडता
झोळणा मज हातचा तर फाटला नाही कुठे.

Saturday, May 12, 2007

अमेरिकेतले पर्यावरणरक्षण

"रोज रोज काय मजेशीर! बस झाले आता विनोदी लेखन. इथे एवढे गंभीर प्रश्न पडलेत दुनियेपुढे आणि तुम्ही काय लिहिताय तर विनोदी..." मी आरशातल्या मला समजावले. आणि शेजारचा दिवा विझवला. मागच्या महिन्यातल्या पृथ्वी-दिवशी मी ऊर्जा-बचतीचा संकल्प केला होता तो अजूनही मी उत्साहाने राबवत होतो. शेवटी स्वरूप पाहिल्याशिवाय विश्वरूप कसे दिसणार - दहावीत असताना विनोबा असे काहीसे म्हणाले होते. असो, तर सांगायचा मुद्दा हा की या वैश्विक प्रश्नामागे मी हात धुऊन लागलो आहे.

त्याच सुमारास असे वाचले की २०२१ पर्यंत उष्मा एवढा वाढेल की पूर आणि दुष्काळामुळे बांगलादेश आणि भारत आदि देशांवर गंभीर संकट ओढवणार आहे. त्याचे मुख्य कारण असणारे अमेरिकेत होणारे अमर्याद प्रदूषण. बापरे! मी जरा घरातच इथे तिथे पाहिले. दोन संगणक चालू, तीन चार बल्ब, दोन ट्यूबा, शीतकपाट आणि चार्जरला एक मोबाईल. डोळेच बाहेर आले माझे. विजेचे बिल सपाट म्हणजे भाड्यातच सामावलेले असल्याने पैशाची काही चिंता नव्हती आणि म्हणूनच ही उधळपट्टी चालू होती. मग ठरवले की आजपासून सुधारायचे.

जळणारे दिवे पाहून सहजच गझल आठवली - ’मालवून टाक दीप - चुप’ पुढच्या ओळीने चित्त विचलित व्हायच्या आधीच गुणगुणणे थांबवले आणि घरातले सगळे उगीच जळणारे दीप मालवून टाकले। जरा अंधार वाटायला लागला पण त्या अंधारात मला उद्याच्या उषःकालाची बीजे दिसत होती. बल्ब बघितले तर सगळे १०० वॅटचे. कुणीतरी घर सोडून जाताना दिले होते आणि फुकट म्हणून बिनदिक्कत जळत होते. "अमरू संस्कृतीची कृपा" असे म्हणून मी मनातल्या मनात दोन चार शिव्या देऊन घेतल्या. इथे घरात ट्यूबा नसतात, असली तर फक्त स्वयंपाकघरात. पांढरा प्रकाश काम करताना आणि पिवळा प्रकाश आराम करताना असा काहीतरी अजब फंडा. त्यामुळे नवीन नवीन असताना घरात नाही तर बार मधे बसल्यासारखे वाटायचे. तसे अमरू लोक घरांमधे पीतवर्ण प्रकाशात पीत बसण्याशिवाय फारसे काही वेगळे कुठे करतात.

बल्ब पण भिंतीवर न लावता उंच उंच खांबांवर लावतात. या बल्बांची बटणे देखील चमत्कारिक असतात. समजा उजवीकडे बटण फिरवल्यावर दिवा लागत असेल तर कुठचाही डोके न फिरलेला माणूस दिवा बंद करायला बटण डावीकडे फिरवेल की नाही, पण ते उजवीकडेच फिरवावे लागते. पंख्याचे तर त्याहून अजब. एक साखळी असते जी एकदा खेचली की पंखा ३ वर, दुसर्‍यांदा खेचली की २ वर, आणि असेच चौथ्यांदा खेचली की बंद. पंख्याचा वेग हा हळू, अतिहळू आणि महाहळू असा अनुक्रमे ३, २ आणि १ साठी असतो. अहो पण म्हणून बिघडतं कुठे, वातानुकूलन असतेच की. पण इथेच तर खरी गोम आहे. आमची इमारत थोडी जुनी आहे त्यामुळे वातानुकूलकातून सहा महिने गरम आणि सहा महिने थंड हवा येते. तापमान नियंत्रण नाही. त्यामुळे थंडी किंवा गरमी या दोन्हीने मरायचे नसेल तर वा.कु. चालू करायचा, पंखा चालू ठेवायचा, खिडकी किंचित उघडायची आणि खिडकीपासून ठराविक अंतरावर झोपायचे, बस! आहे की नाही सोपे. एकूण काय तर विजेचा चुराडा.

पण आता मात्र मी ठरवले की हे सगळे थांबवायचे. तडक कपडे बदलले आणि ट्युबा आणायला निघालो. ऊर्जा वाचणार आणि घराचे बारपण जाऊन घरपण येणार म्हणजे एका दगडात दोन पक्षी! मी स्वतःवरच खूश झालो. खाली गेल्यावर जाणवले की थंडी बरीच जास्त आहे. म्हणून सायकलचा विचार सोडला व बस पकडली. नैसर्गिक वायूचे का होईना थोडेसे प्रदूषण झालेच. दुकानात पोहोचल्यावर लक्षात आले की ट्यूबा लावायला आधी भिंतीवर खिळे ठोका आणि थोड्या तारेवरच्या कसरती (वायरींग) करणे गरजेचे आहे ज्यासाठी इमारत व्यवस्थापनाची परवानगी लागते. च्या***, मी भाषिक स्वातंत्र्याचा उपभोग घेत मोकळेपणाने राग काढला. आता मी मोर्चा ऊर्जा वाचवक बल्बांकडे वळवला. ५ डॉलरला १ !!! म्हणजे ६ बल्बांचे ३० आणि बेसिनच्या वरचे बल्ब धरून ५० डॉलर!!! माझ्या निर्धाराची धारच गेली. आता एकच घेऊ आणि बघू चालतोय का व्यवस्थित अशी काहीशी फुटकळ सबब बनवून एक घरी आणला. आणल्या आणल्या त्याच्या शुभ्र चांदण्याने घर न्हाऊ घालण्याचा मोह काही आवरला नाही आणि तडक सगळे दिवे मालवून एक दिवा काढून ठेवला व नवीन लावला. खटॅक - बटण दाबताच सर्पिलाकार बल्ब मधे जीव आला आणि त्याकडे बघण्याचा गाढवपणा करणार्‍या माझ्या डोळ्यासमोर तारे चमकले. मिटलेल्या डोळ्यांसमोर बराच वेळ त्या सर्पिलाकार उजेडाची निगेटिव दिसत होती. हळू हळू मी डोळे उघडले. काऽऽऽऽऽऽय? पिवळा प्रकाश? खोक्यावर तर लिहिलेय सॉफ्ट व्हाइट म्हणून. तो दिवा डिफेक्टिव असावा म्हणून परत केला आणि तो तसाच पीतप्रकाशी असतो कळल्यावर त्याचा नाद सोडला.

इथे ही दिवेलागणी होत असताना घरात जमलेल्या हजार प्लास्टिकच्या पिशव्यापण खुणावत होत्या। इतका कचरा फक्त आपल्या घरातून जमतो आणि अशी करोडो घरे असतील. आता हा कचरा कमी केलाच पाहिजे. उद्यापासून प्लास्टीक च्या पिशव्या दुकानातून सामान घेताना नाकारायच्या. पहिल्या मोहिमेत चांगलाच फटका बसल्यावर जरा सोपेच ध्येय घेतले होते. पण कळपाच्या विरुद्ध जाणे कठीणच असावे. कारण इथेही लगेचच दैवाचे फासे फिरले. दुकानात नेहमीप्रमाणे ८-१० पिशव्या मिळाल्या. मी अगदी उत्साहाने त्यातले सगळे सामान ३ पिशव्यांमधे बसवले. एक मोठी पिशवी घरून आणलीच होती. उत्साहात पैसे वगैरे देऊन घरी आलो आणि दुसर्‍या दिवशी लक्षात आले की पिशव्या वाचवायच्या गडबडीत एक सॉसची बाटली वाचवलेल्या पिशवीतच गचकली होती.

देव परीक्षा पाहतो ती अशी असावी पण अजूनही उत्साहाने काही बाही करणे चालू आहे. थोडे आव्हान, थोडी मजा आणि थोडे सत्कृत्य करताना बरे वाटते एवढेच.

Thursday, April 26, 2007

शरण्य सबमिशन

आता हा माउस कुठे ठेवायचा असे म्हणून थोड्या कागदांचे दुसरीकडे पुनर्वसन करण्याचा मी प्रयत्न केला पण एक कागद सरकताच दुसऱ्याने त्या जागेवर अतिक्रमण केले. त्या भानगडीत माझे लक्ष गुंतल्याचे पाहून एका पेन्सिलीने टेबलावरून उडी मारून आत्महत्येचाही प्रयत्न केला. पुस्तके वगैरे दांडगट मंडळी माझ्या झटापटीला दाद देत नव्हतीच. पण मधेच कळफलकाच्या कडा सर करून नसत्या कळा दाबून विरोध व्यक्त करत होती. त्यांचा एका हाताने कळफलकावरून कडेलोट केला तर त्या धक्क्याने कोपर्‍यातले पुस्तकांचे डोलारे डोला रे डोला रे करायला लागले. परिस्थिती हाताबाहेर जायला लागली आणि एफ् एम ने सुरात सूर मिसळला "इन्किलाब झिन्दाबाद".

माझे धाबे दणाणले होते. सामानांचा असामान्य लढा चालू होता माझ्याविरुद्ध, तोही असहकाराच्या शांततामय मार्गाने. लगेच मागल्याच आठवड्यात आणलेल्या "गांधी विरुद्ध गांधी" च्या सीडीला हुडकले, अपेक्षेप्रमाणे टेबलावरच सापडली. लगेच तिची रवानगी जमिनीवर केली. मी पण काही ऐकणार नव्हतो. तसा माझा भुता-प्रेतांवर विश्वास नव्हता, ना घडणार्‍या घटनांच्या अर्थपूर्णतेवर. पण आल्या परिस्थितीला तोंड देणेही भागच होते. अजूनही माउस शेपटीच्या बळावर टेबलावरून खाली लटकत होता. स्पीकर वगैरे बिनमहत्त्वाची मंडळी अजून खोक्यातच लपून होती. नव्या संगणक सेलेरॉन नसून सायमन आहे असा मला भास व्हायला लागला.

"भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे .. - कंग्रॅज्युलेशन्स! यू हॅव वन अ फ्री आय-पॉड नॅनो". आशाबाईंच्या निराशामय गाण्यामध्ये किरकिर्‍या आवाजातल्या उपटसुंभ जाहिरातीने माझी चांगली झोपमोड केली. मगाशी लटकणाऱ्या माउसला, त्याची शेपटी गालाखाली घेऊन मी जो आधार दिला होता त्याचे वळ गालावर उमटले होते. "गांधी वि. गांधी" याची सीडी आणि डबा यांनी टेबलाच्या पायथ्याशी विरुद्ध दिशेत झेप घेतली होती. डोळे किलकिले करून पाहिले तर समोर अर्धवट टाइप झालेला रिपोर्ट तसाच माझ्याकडे आ वासून पाहत होता. आणि भिंतीवरचे घड्याळ मला दोन्ही हात जोडून नमस्कार करत होते. काय? बारा? xxxx. अजून प्रेझेंटेशनची तयारी उरलिये.

ही आहे विद्यार्थी"दशा". कायम काहीतरी "ड्यू" असणे आणि ते जिवाचा आटापिटा करून वेळच्या वेळी सबमिट करणे ही "ड्यूटी". आणि सबमिशन म्हणजे शरण जाणे. या दोन शब्दांचे उगम असे असतील हे आता मला कळले. जुलूम जबरदस्तीने वेळेच्या मागे धावत राहण्याचे शिक्षण असे चालूच राहते. कधी कुणाचे बघून लिही, कधी कामे वाटून घे, त्यातूनही स्वतःचे वेगळेपण जप असे प्रकार करत करत विद्यार्थीदशा माणसाला घडवत जाते. आणि त्यातूनच घडतात किंवा बिघडतात आपल्या आजूबाजूची माणसे. अवास्तव अपेक्षांचे मोठे ओझे वागवण्याची आणि त्याविषयी तक्रारी करत राहण्याची एवढी सवय होते की त्या स्वतःहून निर्माण केल्या जातात. अशी माणसे स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य याच चक्रात भरडत राहतात. उदाहरणार्थ आमचे शिक्षक चेंग, हे टोपणनाव नाही चिनी नाव आहे, ज्यांच्या वर्गात उद्या आमचा ’निक्काल’ लागणार आहे.
------

"आमच्या वेळी किती अभ्यास होता माहितिये का? १५-१५ पौंडांचे एक एक पुस्तक होते", चिनी पुस्तकाबद्दल, चिनी ढंगात, जवळपास चिनीच वाटणार्‍या इंग्रजीत त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा ऐकवले. त्या पुस्तकांचा वापर करायला माझे हात शिवशिवत होते. काल रात्रीची झोप बदले की आग में सारखी डोळ्यांवर चाल करून येत होती. त्यातून ३० वर्षांपूर्वीच्या चिन्यांच्या चुकांची उजळणी, आजच्या खंद्या तरुण पिढीला पुन्हा एकदा झोपवत होती. "आजचे प्रेझेंटेशन ३०% चे आहे याची आठवण करून देऊन स्वतः शेवटच्या बाकावर विराजमान झाले".

१-२ मिनिटांच्या खटपटीनंतर प्रोजेक्टर पेटला व आमच्या भविष्यातला अंधकार कमी झाला. एकेका स्लाइड वरून घसरत धन्यवाद पर्यंत पोहोचलो आणि हुश्श केले. "कुणाला काही प्रश्न असतील तर..." (कुणाला म्हणजे चेंगसरांना, जशास तसे न्यायाने मुले तर नेहमीच सर्वज्ञ असतात.) असे म्हणून मी चेंडू पेंगणार्‍या चेंगच्या पुढ्यात ढकलला. पण ही चेंगपेंग खूपच दिक्भूलक ठरली. माझ्या सरपटी रबरी चेंडूच्या उत्तरात त्यांनी सीझनच्या चेंडूने एकावर एक उसळते प्रश्न टाकले. सगळेच नो बॉल पण पंचांच्या गोलंदाजीने सगळे अंदाज गोल करून टाकले.

आणि नहमीप्रमाणे दुखापतीने हैराण असे आम्ही पुढच्या सामन्याची तयारी करायला परतलो.

Saturday, April 21, 2007

अमेरिकेतील रोजचा प्रवास

आज कविता सोडून काहीतरी दुसरे लिहिण्याचा मूड आलाय. दुसरे काही म्हणजे गद्य. पुलं म्हणतात त्याप्रमाणे गद्य नाही ते पद्य आणि पद्य नाही ते गद्य हे अगदी खरेय. असो. आधी बराहा.कॊम चे आभार. त्यांनी जरा लिहायची सोय केलीये मराठीतून. असो.

विचार अगणित आहेत त्यामुळे सुरुवात करणे जरा कठीणच. म्युन्सिपाल्टीच्या मजुराला "जा, रस्त्यावरचे खड्डे बुजव" असे सांगितले, तर तो जसा बुचकळ्यात पडेल तशी काहीशी अवस्था आहे. रस्त्यावरून आठवले, ट्रॉलीत (शाळेची बस) बसून दररोज हजार धक्के खाताना देशातले रस्ते बरे असे वाटत राहते. आणि देशात याच्या उलट वाटते हे सांगणे न लगे. "यू हॅव प्लेंटी ऑफ कंप्लेंटी, इट्स युवर स्वभाव", एक इंग्रजाळलेला मित्रवर्य स्व भाव खात सांगतो. बसमधे बसून धक्के न लागून घेणे हे आपल्या बस मधे नसले तरी तो स्वभावाचा भाग कसा बनतो देव जाणे.

अमेरिका म्हटले की आपल्या डोळ्यासमोर तरळतात उंच उंच इमारती अन त्यांच्या काचांइतकेच गुळगुळीत रस्ते. रस्त्यात पाहाल तर प्रतिबिंब दिसेल. पण प्रत्यक्षात मात्र चालताना रस्ता न पाहाल तर प्रतिबिंब बघणेबल राहणार नाही. तसे म्हटले तर इथल्या म्युन्सिपालट्या कायम हा ना तो रस्ता दुरुस्त करतच असतात, त्यामुळे रस्त्यावरून जाताना सगळ्या लेन्स वाहनांसाठी मोकळ्या असणे कठीणच. अजस्र वाहने, जी ऑटोमॅटिक रस्ता बनवतात आणि त्यांच्या बाजूला एक पोलिसकाका हे दृश्य अगदी नेहमीचे आहे. इथल्या पोलिसकाकांना लोक जाम घाबरतात. पोपटी जॅकेट आणि त्यावर मोठ्या अक्षरात पोलिस असे लिहिलेले हे नमुने रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून चित्र विचित्र हातवारे करत असतात. आणि गाड्या शांतपणे इथून तिथून ये जा करत असतात. बसमधे बसून मी निरीक्षण करत असतो आणि शांतपणाने चाललेल्या या गर्दीत विचार करतो. कुठे हॉर्न नाही कुठे गोंगाट नाही कौतुकास्पदच.

तसा अमेरिकन माणसांचा समंजसपणा, एकमेकांविषयीचा आदर हे एक कोडेच आहे. इमारतीचे दार उघडणारा माणूस मागच्या व्यक्तीच्या अंगावर ते बंद होऊ नये म्हणून पकडून ठेवतो, रस्त्यावर अनोळखी माणूसही हाय करतो पण हाच अमेरिकन बसमधे पसरून बसला की दोन जागा खातो आणि हालतही नाही. त्यांची बससंस्कृती जरा वेगळी असावी. इअरफोनचे दोन बोंडुक कानात टाकून बसभर ऐकू येईल एवढ्या आवाजात गाणे लावले असताना त्याच्या मेंदूकडून अजून काही अपेक्षा करणेही तसे गैरच म्हणा. पण यांचे कर्ण कवचकुंडले घालूनच जन्मत असावेत, कारण जवळपास प्रत्येक अमरू आपल्याहून हळू आवाजात बोलतो अन ऐकलेले समजतो पण.

इथे सरकारी बशींचा/ट्रेन्सचा वापर तसा कमीच. विद्यार्थीवर्ग, गरीब-गुरीब अमरूजन आणि देशी-चायनीज कर्मचारीवर्ग यांचा प्रामुख्याने भरणा. बाकी सगळे कारसेवा करण्यातच पुण्याई मानणारे आणि रोज वाढणार्‍या कोंडीच्या आणि गॅसच्या भावाच्या नावाने खडे फोडणारे. आवळलेल्या टायमधून प्रदूषण आदि कल्पना यांच्या गळी उतरवणे कठीणच. कधी-कधी यांच्या पर्यावरण-जागृतीविषयक कल्पना पण अचाट असतात - आता परवाच पृथ्वी-दिवस साजरा झाला आमच्या शाळेत. त्यात एक उपक्रम राबवला तो असा - प्रत्येकाने एका पृथ्वी-दिवस कूपन चे प्रिंटाउट काढायचे आणि ते रिसायकल पेटीत टाकयचे. वाह! मान लिया इनको. यांना सांगितले की शक्यतो एका कारमधून अनेक जण एकत्र प्रवास करा तर हे ऑफिस मधून एकट्याने आल्यावर घरच्यांना घेऊन पुन्हा छोटी चक्कर मारून येतील.

असो. तर एकूण काय - घरोघरच्या चुली मातीच्या नसल्या तरी भाकरीचा प्रवास खडतरच.