Sunday, December 02, 2007

भाषा आणि लैंगिक भेदभाव

काल सायंकाळी बायकोबरोबर घराजवळच्याच एका मॉल मध्ये गेलो होतो. तिथे जेवणाचा आस्वाद घेताना शेजारच्या टेबलाकडून एक दोनेक वर्षाची (माझ्यामते) मुलगी (माझ्यामते) धावत आली आणि आमच्या टेबलाशेजारी उभी राहिली. दिसायला एकदमच गोड होती आणि अमेरिकन असूनही आमच्याकडे बघून अगदी हसत खिदळत होती. नाहीतर बहुतांश अमरू बाळे एकदम गोबरी गोबरी पण मख्ख असतात. ट्रेनच्या डब्यात अमरू बाळ असेल तर त्याच्या आई वडिलांखेरीज कुणालाही फारसे कळत नाही पण देसी किंवा चायनीज बाळ असेल तर ते शेजारच्या डब्यात पण कळते.

असो, तर सांगायचा मुद्दा हा की ही गुंड मुलगी आमच्या शेजारी येऊन उभी राहिली आणि आम्ही तिची सोबत एंजॉय करत होतो. एवढ्यात तिचा बाप (माझ्यामते) कुठूनसा आला आणि त्याने अमेरिकन शिष्टाचाराप्रमाणे त्या मुलीच्या वतीने 'एक्स्क्यूज अस' म्हटले. तोही हसतमुख होता त्यामुळे आम्हाला फारसे ओशाळल्यासारखे झाले नाही. इथे देशातल्याप्रमाणे लहान मूल दिसले आणि तुम्ही १ मिनीट थांबून सहज खेळलात असे करता येत नाही, म्हणजे सभ्यपणाचे समजत नाहीत. त्या मुलाचे आई-बाप तुमच्याकडे 'हा मायकेल जॅक्सन पंथातला तर नाही' अशा नजरेने बघतात. आता एवढे सगळे घडल्यावर ती मुलगी किती गोड आहे हे तिच्या बापाला सांगणे ओघाने आलेच. आणि यावेळी गाडी लिंगभेदावर अडकली - ती खरच मुलगीच आहे ना, की मुलगा (की अजून काही चा प्रश्न तूर्तास बाजूला ठेवू). माझ्या तोडक्या मोडक्या इंग्रजीला ताण देऊन 'तो' किंवा 'ती' यांचा उल्लेख टाळून वाक्य बनवायचा प्रयत्न केला पण छे! बर त्या बापाला विचारावे की ही मुलगी आहे की मुलगा, तरी जरा कसेनुसेच वाटते. शेवटी एक स्माइलसे मामला निपट दिया.

आता तो/ती गोड होता/होती सांगायला लिंग माहित असण्याची काय गरज होती. पण नाही, ते माहित असावे लागते. अबक आंबा खातो/खाते हे सांगायला अबक चे लिंग माहित असावे लागते. अबक ला शाळेत प्रवेश घेताना जात दाखवावी लागते तशातलाच प्रकार. अबक दूध पितो या वाक्यात अबक पुंलिगी असल्याचे तर कळते पण अबक कुत्रा, बोका की गणपती यांपैकी काय ते कळत नाही. म्हणजे भाषेला पुंलिंग स्त्रीलिंगी मध्ये भेद करण्याची गरज इतर गोष्टींहून जास्त वाटते. आहे की नाही आश्चर्य. भाषा भाषांमध्ये हा फरक थोड्याफार फरकाने जाणवतोच.

आता भाषा-भाषांच्या गमती बघा. मराठीमध्ये तो/ती पिझ्झा खातो/खाते, म्हणजे सर्वनाम आणि क्रियापदात भेदभाव. पण तेच नकारार्थी वाक्यामध्ये तो/ती व्यायाम करत नाही म्हणजे नकारार्थीसाठी जास्त समानता. हिंदीमध्ये 'वह चारा खाता/ती है और रबडी नहीं खाता/ती' म्हणजे सर्वनामात किंवा होकारार्थी नकारार्थी मध्ये फरक नाही पण क्रियापदात आहे. इंग्रजीत 'ही/शी ड्रिंक्स बीअर बट डझ नोट ड्रिंक वॉटर' म्हणजे सर्वनाम सोडून बाकी सगळे तसेच (टल्ली). फ्रेंच मध्ये म्हणे सर्वनाम, विशेषण, क्रियापद सगळेच बदलते.

कदाचित हे फरक त्या त्या समाजाचा स्त्री पुरुषांकडे बघण्याचा दृष्टीकोन दाखवतात. हजारात एक संदर्भ असा असतो की ज्यात स्त्री पुरुष फरक कळेल. जसे - अबक गरोदर आहे. त्यासाठी सरसकट सगळ्या क्रियापदांना वेगळे वागवणे थोडे अचंबाकारक आहे. अर्थात याचे श्रेय बऱ्याच वर्षांपूर्वी ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्या भाषा बनवल्या त्यांना जायला पाहिजे. असेही म्हणता येईल की जेव्हा भाषांचा उगम झाला तेव्हा स्त्री पुरुष यांच्या संबंधांशी निगडित क्रिया आणि अन्नशोध यांचाच प्रभाव असल्याने 'हजारात एक' च्या ऐवजी 'दोनात एक' असेल. पण विकसित समाजातही असा बदल दिसतो. जसे 'स:/सा कन्दमूलानि खादति' या फक्त सार्वनामिक बदल असणाऱ्या भाषामातेच्या पोटी 'तो/ती भाकरी खातो/खाते' एवढा मोठा फरक असणारी भाषा जन्मली. या एका फरकात त्या काळच्या सामाजिक परिस्थितीमधील बदलाचा बराच मोठा प्रभाव जाणवतो.

तर एकूण काय, उगीच अनोळखी माणसांच्या पोरांना 'गोड' वगैरे म्हणण्याच्या भानगडीत पडू नये हेच खरे.