Thursday, November 25, 2021

पाऊस ज्याचा त्याचा

पा

ऊ 

स 

ज्याचा त्याचा



पानावरती टपटप पडती, थेंब टपोरे बागडती 

न त्यावरी दिसते मोहक, कुणी लुटे आनंद किती 

गळ्यांचे पण असे नसे 


पाणी गळते छपरामधुनी, वारा न जुमाने भिंती 

ब हरवते घरातली अन मनात राहे फक्त भिती

गळ्यांचे पण असे नसे


पाटामधुनी खळखळ पाणी, बहरुन आलेली शेती 

स उभा जोमात वाढतो, कुणास दिसते श्रीमंती

गळ्यांचे पण असे नसे 


पात्रामध्ये नदी न मावे, सागरास येते भरती 

र फोडुनी टाहो करती, कुणी तिथे छपरावरती  

गळ्यांचे पण असे नसे 


पाय थिरकती नशेत झुलती, कोसळत्या धारांवरती

त येइ बीभत्सपणाला, कुणी बाटली करी रिती

गळ्यांचे पण असे नसे


पायवाट चिखलाची जाता, कपड्यांवर नक्ष्या बनती

र्मीने भरलेल्या छोट्या, कुठे मस्त होड्या पळती

गळ्यांचे पण असे नसे


पाऊसच तो सर्वांसाठी, भावना निराळ्या चित्ती

र्ध्वेकडुनी धारा येती, हसती रडती अन सरती

गळ्यांना भिजवून असे 



  • ओंकार कऱ्हाडे ७/३०/२०२०

Wednesday, November 24, 2021

रंगुनी रंगात साऱ्या - अमेरिकेतल्या मराठी माणसाची गझल

 रंगुनी रंगात साऱ्या - अमेरिकेतल्या मराठी माणसाची गझल

© Omkar Karhade


रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा 

इकडचे गोरे नि काळे रंग माझा सावळा 


पश्चिमेचा वेष यांचा पश्चिमी भाषा तशी

चालण्या अन बोलण्याचा ढंग माझा बावळा


बाह्यरंगी सरळ साधी चाकरी अन भाकरी 

अंतरंगी पाहता मज अंतरी नाना कळा 


आपले मी मानिले हो ख्रिसमसालाही इथे 

आणि हॅलोवीनसाठी आणिला मी भोपळा 


हरितरंगी कार्ड येण्या लागली वर्षे जरी 

लाभल्या दिवसात माझा मांडतो मी सोहळा 


-ॐ 

Sunday, September 11, 2011

Technology

गेले निघोनि मित्र पडलेत ओस कट्टे
ऑर्कूट फेसबुकवर हाय् बाय रोज होते

सुचतील काय गप्पा, प्रत्यक्ष भेट होता
संपून विषय गेले, परवाच चॅट करता

हिरवे कुणी नि लाल, स्टेटस कुणास पिवळे
अदृश्य ते कुणी हो, लपण्यात धन्य झाले

आले मनात काही, झाले क्षणात पोस्ट
प्रत्यक्ष बोलण्याचे घ्यावे कशास कष्ट?

डोळ्यामधील भाव, खांद्यावरील हात
नसता कशा विणाव्या गाठी मनात घट्ट?

या नेटने जगाला का आणिले समीप
हे बंध रेशमाचे लोटीत दूर खूप

Sunday, July 03, 2011

निरोप कायमचा - गझल

आता भेटू नको पुन्हा तू निरोप देतो कायमचा
दिलास तितका त्रास पुरे मी निरोप घेतो कायमचा

प्रेम कसे झाले, फुलले, कळले न कधी मजला तेव्हा
क्षणिक सुखाच्या मागे सगळा गुंता होतो कायमचा

नाती, गोती, जाती, पाती बनल्या भिंती फक्त तुला
नव युगातही अडाणीपणा रक्त शोषतो कायमचा

वचन दिले अन वचन घेतले वजन राहिले ना शब्दा
प्रेमामधल्या आठवणींचा चोथा उरतो कायमचा

परिस्थितीला ठरवुन दोषी, अशी कशी सुटशील सखे
लढल्याविन जो हरतो पश्चात्तापी झुरतो कायमचा