पा
ऊ
स
ज्याचा त्याचा
पानावरती टपटप पडती, थेंब टपोरे बागडती
ऊन त्यावरी दिसते मोहक, कुणी लुटे आनंद किती
सगळ्यांचे पण असे नसे
पाणी गळते छपरामधुनी, वारा न जुमाने भिंती
ऊब हरवते घरातली अन मनात राहे फक्त भिती
सगळ्यांचे पण असे नसे
पाटामधुनी खळखळ पाणी, बहरुन आलेली शेती
ऊस उभा जोमात वाढतो, कुणास दिसते श्रीमंती
सगळ्यांचे पण असे नसे
पात्रामध्ये नदी न मावे, सागरास येते भरती
ऊर फोडुनी टाहो करती, कुणी तिथे छपरावरती
सगळ्यांचे पण असे नसे
पाय थिरकती नशेत झुलती, कोसळत्या धारांवरती
ऊत येइ बीभत्सपणाला, कुणी बाटली करी रिती
सगळ्यांचे पण असे नसे
पायवाट चिखलाची जाता, कपड्यांवर नक्ष्या बनती
ऊर्मीने भरलेल्या छोट्या, कुठे मस्त होड्या पळती
सगळ्यांचे पण असे नसे
पाऊसच तो सर्वांसाठी, भावना निराळ्या चित्ती
ऊर्ध्वेकडुनी धारा येती, हसती रडती अन सरती
सगळ्यांना भिजवून असे
ओंकार कऱ्हाडे ७/३०/२०२०