Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Sunday, September 11, 2011

Technology

गेले निघोनि मित्र पडलेत ओस कट्टे
ऑर्कूट फेसबुकवर हाय् बाय रोज होते

सुचतील काय गप्पा, प्रत्यक्ष भेट होता
संपून विषय गेले, परवाच चॅट करता

हिरवे कुणी नि लाल, स्टेटस कुणास पिवळे
अदृश्य ते कुणी हो, लपण्यात धन्य झाले

आले मनात काही, झाले क्षणात पोस्ट
प्रत्यक्ष बोलण्याचे घ्यावे कशास कष्ट?

डोळ्यामधील भाव, खांद्यावरील हात
नसता कशा विणाव्या गाठी मनात घट्ट?

या नेटने जगाला का आणिले समीप
हे बंध रेशमाचे लोटीत दूर खूप

Thursday, June 16, 2011

अशात भेटलो कुठे - गझल

मी जुन्या मला अशात भेटलो कुठे
मस्त जीवना अशात भेटलो कुठे

भावना मनात ठेवल्या नि कोंदल्या
मुक्त अंबरा अशात भेटलो कुठे

कूपमंडुका समान खुंटली मती
भव्य सागरा अशात भेटलो कुठे

गोंधळात कर्म वेंधळी, कटु फळे
शांत निर्झरा अशात भेटलो कुठे

राहिला न धर्म, भक्तिभाव लोपला
देव मंदिरा अशात भेटलो कुठे

नोकरीत व्यस्तता नि व्यस्तता घरी
धुंद पाखरा अशात भेटलो कुठे

मज कसे कळेल निस्तरायचे कसे
कारणास आरशात भेटलो कुठे

-ॐ

Sunday, January 04, 2009

विरह

शब्द हरवले आज साजणी जवळी तू नसता
स्तब्ध मी एकाकी बसता

आठवणी त्या गोड क्षणांच्या किती चिती भरल्या
मला ज्या क्षणोक्षणी स्मरल्या

वेळ कोणती कुठे चाललो कसे कळेना गे
जाहलो खराच वेडा गे

प्रेम करावे कसे, शिकावे तुझ्याकडून सखे
जे कधी नसे कुणासारखे

तुझ्याचसाठी ओघळले जे हळूच मी पुसले
लपवले तरी तुला दिसले

आज मिठीतुन निघता वाटे तोल सावरेना
सखे गे परतुनि तू ये ना

Wednesday, May 07, 2008

किती वाट पाहू

किती वाट पाहू किती वाट पाहू
तुझी ही अशी मी किती वाट पाहू

जसे दाटती मेघ आकाशरानी
हवा कुंद गाई जणू मूकगाणी
कसा धुंद मी मुक्त हा श्वास घेऊ
किती वाट पाहू किती वाट पाहू

जशा सागरी येत लाटा दुरूनी
किनारी ध्वनी तोच तो येई कानी
किती घट्ट मी कान दाबून ठेवू
किती वाट पाहू किती वाट पाहू

दिसे कामिनी चेहरा का दिसेना
करी स्पर्श जो हात तोही दिसेना
कसा चित्र अस्पष्ट रेखीत जाऊ
किती वाट पाहू किती वाट पाहू

जसा तोषितो मेघ तृष्णा धरेची
करी सांगता खिन्नते रिक्ततेची
कधी स्वप्न सत्यात गे हेहि पाहू
किती वाट पाहू किती वाट पाहू

Sunday, November 18, 2007

चकवा

का असे घडते इथे, कळले कधी का ना मला
मार्ग जो चोखाळला त्याने दिला चकवा मला

पौर्णिमेच्या चांदण्याची पाहतो का वाट मी
द्वादशीचा चंद्रही नाही कधी दिसला मला

वाळवंटी वाढलो अन् सागराला भेटलो
पोहणे सोडाच, ना आले कधी भिजता मला

रूप बदले, रंग बदले मी स्वत:ला शोधतो
आरश्याचा चेहरा म्हणतो कधी सरडा मला

चपलता आता पुरे 'ओंकार' पळण्या अंत ना
झाकुनी डोळे उभा, आतातरी पकडा मला

ओंकार कर्‍हाडे

प्रकाशित मनोगत दिवाळी अंक

Wednesday, August 23, 2006

तिला मला...

शुक्र, १८/०८/२००६ - २१:४१

सगळे कळे तिला अन् सगळे कळे मला
शब्दात तीक्ष्ण काटे खुपले तिला मला

संवाद पाकळ्यांचे खुडले कुठून गेले
मधुरात्र भंगताना दिसले तिला मला

या कोरड्या जगाला का वेदना कळाव्या
अश्रूंबरोबरी या टिपले तिला मला

वाट्यास ना मिळाव्या थोड्या निवांत घटिका
का व्याप वाटताना गुणले तिला मला

पण बंध रेशमाचे सुटणार हे कधी ना
ना गाठ बांधली पण विणले तिला मला

Sunday, August 13, 2006

रजा

रवि, ०६/०८/२००६ - २०:००

रोज पहाटे, उठता वाटे, तांबडे फुटे का?
मोडते स्वप्नांचा झोका

मधुर गजर वा टिटिटि असो, कर्कश्य भासतो का?
वाटते घड्याळास ठोका

गजर दाबला, पडदे मिटले, कान सोडले का?
बांग त्या मशिदीची ऐका

उठलो कधिही तरी, रोज हा उशीर होतो का?
बॉसला थाप नवी फेका

रजा रजा अन् रजा रजा मन रजा मागते का?
'र'जाता निजे स्वस्थ 'ॐका'

-ॐकार

नरक

सोम, २४/०७/२००६ - ०९:२६

स्तब्ध रात्री त्या अचानक झोप माझी मोडली
देव वदला प्रकटुनी की लीज़ (lease) माझी संपली

थबकलो, काही कळेना, घर्मबिंदू चमकले
यमदुता दुरुनीच यामाहा वरी मी पाहिले

संपले, कळले मला, पळुनी तरी जाऊ कुठे
घेउनी मजला वरी, मोटार आकाशी उठे

पोचलो, उड्डाण करुनी, भव्य मोठ्या दालनी
लोचनी सामावल्या ना दालनीच्या लायनी

तिष्ठलो, मी जाळले साडे सहा घंटे कसे
आसने ना मासिके, टी. व्ही. वरी काही नसे

लागला अंती कधी नंबर कुण्या खिडकीमधे
'अप्सरा - बी.कॉम.' खोटे गोडसे हसुनी वदे

फॉर्म भरले शेकडो, केल्या हजारो चौकशा
तीन पडले गुण कमी, नरकाकडे वळल्या दिशा

जाउदे, स्वर्गात धनिकांचेच चाले तेवढे
अप्सरांचे लाड आम्हाला कुठे हो परवडे

काहिसे घडले अचानक, परत भू वर सोडले
"वाढली आरक्षणे नरकामधे", मी ऐकले

-ॐ

का सखे का...

गुरु, १४/०७/२००५ - ०१:५४

का सखे का प्रेम हे मेघावरी केले उगा
श्रावणाचा दोष तो, नाही कुठे झाला दगा

बरसला तो, बरसणे हे काम, त्याचे नेमके
कोरडी झालीस आता, बोल त्याला शेलके?

कालचा जो सावळा, तो आज आहे उजळला
त्या दिलेल्या सप्तरंगा, ना तरी तो विसरला

प्रेम, असते आंधळे बहिरे मुके वेडे पिसे
जागते ना झोपते, तुजला जसे, त्याला तसे

मान्य तुजला बंधने, आकाश त्याला मोकळे
पण कुठेही नेतसे वारा, तुला का ना कळे?

आजही तो वाहतो अन् शोधतो चारी मिती
काय तुजला माहिती, झुरला किती, उरला किती?

मी बोलणार नाही

शुक्र, ०८/०७/२००५ - ११:५२

रुसवा उगाच लटका "मी बोलणार नाही"
प्रेमात ऐकतो का? "मी बोलणार नाही"

ही रात धुंदलेली, हा श्वास तापलेला
फिरवून तोंड सांगे, "मी बोलणार नाही"

तालात आज लाटा, साथीस येइ वारा
रागात सूर लागे, "मी बोलणार नाही"

खुडली कितीक पुष्पे, देवीस वाहिली त्या
ना.. "क्यूट, गोड"... काही, "मी बोलणार नाही"

अपराध काय झाला? का तारखा विसरल्या?
काही विचारले की, "मी बोलणार नाही"

डोळ्यात पाहता मी, संवाद रंगले की
ओठास ओठ भिडले, 'मग बोललोच नाही'

विडंबन (पत्र लिही पण)

मंगळ, १७/०५/२००५ - ००:००

मूळ कविताः पत्र लिही पण...

पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधुनी काजळ गहिरे
लिपिरेषांच्या जाळीमधुनी
नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भुवईमधली
नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा
पूर्ण विरामाच्या बिंदूतून

नको पाठवू अक्षरांतुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातुनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा
सांगितलेः तू हट्टी पण...

पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्रच पुढचे त्यानंतर पण
वाचायाचे राहून जाते

इंदिरा संत

विडंबनः पत्र लिही पण

पत्र लिही पण काजळाविना
डाग जाइना घासल्याविना
हसायचे तर हास मोकळे
सख्या बावळ्या लाजल्याविना

वाक्य लिही पण खोडल्याविना
काना मात्रा चुकवल्याविना
ओतलीस तू विरामचिन्हे
क्षमा करी या शुद्धलेखना

शब्द अधूरे देउनी पुन्हा
नको थांबवू हृदयस्पंदना
पत्रामध्ये लिहू नको रे
कंप वात अन् अधिक वेदना

अत्तरातला गंध हा जुना
समजत नाही हुंगल्याविना
घडी मोडता कागद फाटे
कितिदा सांगू अता सुधर ना

वाच पत्र ते थांबल्याविना
समजणार ना त्रासल्याविना
पत्रच पुढचे राहुन जाते
नेहमीच का वाचल्याविना

(विडंबक) ॐ

सत्य ग्रेसाळता...

शुक्र, २२/०४/२००५ - ०३:२६

जरी भावली सभ्यता
अता क्रोशते शांतता

विनामोल, गर्तेमधे
तमाची खुले भग्नता
'उद्या'-वाळवी आज ना
नवी आजची जीर्णता

दिला प्राण हा नासका
तरी मिथ्यशी सार्थता
सुन्या गम्य मार्गावरी
झणी धावते संथता

वृथा भाव ना कोरडे
तनी सांडती स्निग्धता
इथे सप्तफेऱ्यांमध्ये
अता हासते दीनता

"असा 'ॐ' नवा जन्म हा"
फसे, सत्य ग्रेसाळता

-ॐ

तुझ्या कृपेने

गुरु, १४/०४/२००५ - ००:००

तुझ्या कृपेने कधी नव्हे ती, रोज अमावस आहे
डाव सुखाचा मोडलास तू, मनी वेदना आहे...

प्रीतिफुलांचा सुगंध होता, पुन्हा मोहरत न्यारा
तव पुष्पे कुस्करताना तू, क्रूर भासते आहे...

सुंदर मनने, नाजुक कवने, दिली घेतली वचने
कशी विसरली क्षणात गे, मी अजून स्तंभित आहे...

हृदयाच्या उघड्या दारांतुनी, धावलीस बहु माझ्या
बंद कवाडा पुढे अजूनी, तुझ्या उभा मी आहे...

पैंजणात रुमझुमलो होतो, कंकणात किणकिणलो
आज स्मृतींच्या कंकणातुनी, वीज कडाडत आहे...

तुझ्या सुखांच्या समईमध्ये, मंद मंद तेवलो
वात कोरडी, आज भोवती, तेल पेटले आहे...

"प्राक्तनात 'ॐकार', रेखिला घात, जाणवे आता"
तिचा चेहरा, घेउन छद्मी, दुःख हासते आहे...

मना नको...

रवि, ०३/०४/२००५ - ०२:५८.

मना नको मना नको नदीत टाकु नाव रे
मना नसे कधी तुला नदी प्रवाह ठाव रे
मना कधीच ऐकणार नाहि का तु सांग रे
मना नको मना नको नदीत टाकु नाव रे

मना नसेल ऐकिले तु मागच्याच वेळि रे
मना अता तरी जरा तु शाहणाच होइ रे
मना कुठे हि नाव गेलि लाग पाठि धाव रे
मना नको मना नको नदीत टाकु नाव रे

मना पुन्हा पुन्हा हि हेंदकाळतेच नाव रे
मना पुन्हा पुन्हा कसा बसे तिलाच घाव रे
मना पुन्हा पुन्हा मि सांगि दे तिला अधार रे
मना नको मना नको नदीत टाकु नाव रे

मना असा कसा तु काळजी मुळीच नाहि रे
मना बुडे पुन्हा अशी तुझीच पाहि नाव रे
मना कशास मानि दुःख त्यामध्ये उगीच रे
मना नको मना नको नदीत टाकु नाव रे

मना अता तु बैसुनी पहा नदी हि छान रे
मना तुझी तु नाव घेउनीच राख काठ रे
मना कशा अशा प्रवाह वेदना उगाच रे
मना नको मना नको नदीत टाकु नाव रे

तिची भेट...

रवि, २७/०३/२००५ - ०१:००

हे दोन मित्रांमधले संभाषण. पहिला मित्र त्याच्या प्रियेला भेटून आलाय नुकताच अन् खूपच कष्टी दिसतोय. म्हणून दुसरा मित्र त्याच्या दुःखाचे कारण शोधून त्याचे सांत्वन करायचा प्रयत्न करतोय. त्याने विचारलेले प्रश्न आणि उत्तरामधला नन्नाचा पाढा यातून निर्माण झालेले हे विनोदी प्रेमकाव्य...

प्रेम घेउनी नाही आली?... नाही
सुखे घेउनी नाही आली?... नाही
असेल आलिच हसू घेउनी?... नाही
असेल आली आसु घेउनी?... नाही

अवखळ तो उत्साहहि नव्हता?... नाही
शब्द-तुटवडा भासत नव्हता?... नाही
आवाजी त्या मार्दव नव्हते?... नाही
शब्दांमाजी आर्जव नव्हते?... नाही

घेउनि आली का ती चिंता?... नाही
आली का ती होउनि चिंता?... नाही
भरली ती रागे का तुजला?... नाही
रुसवा खोटा नसेल कळला... नाही

डोळ्यांमध्ये तुझ्या हरवली?... नाही
कुशित तुझ्या ती होती शिरली?... नाही
ओठांमध्ये असेल उरली?... नाही
मिठीत होती विरघळलेली?... नाही

शब्दीं त्या तू होता ना रे?... नाही
नेत्री तरि तू होता का रे?... नाही
हास्यामध्ये असशिल वेड्या... नाही
रुसव्यामध्ये असशिल लपला... नाही

प्रश्न कसाही उत्तर तरिही "नाही"
तरी संभ्रमित झाला परि तो नाही
वदता तो अपशब्द जाहला काही
सरळ सांग ना आज ति आली नाही

मालिनी

रवि, २०/०३/२००५ - १७:३५

सतत छळत होते, वेड हे मालिनीचे
चतुर चपल का हे, चालणे मालिनीचे

भ्रमण कितिक केले, भेटण्या मालिनीला
व्यथित विरह होता, आठवी मालिनीला

विचलित अति होतो, पाहता मालिनीसी
कणभरहि न ठावे, काय हे मालिनीसी

अचल नजर माझी, न्याहळे मालिनीला
अचपल जरि ती ही, आवडे मालिनीला

थबकत बघ आली, आज का मालिनी ही
मनन मम असे हे, ऐकिते मालिनीही

प्रथम परिस झाला, स्पर्श हा मालिनीचा
सुगम सुरस झाला, संग हा मालिनीचा

(मालिनीप्रेमी) ॐ

सोप्पं प्रेम?

रवि, १३/०३/२००५ - ०१:००

प्रेम कधी सोप्पं असतं का?

प्रेम कधी सोप्पं, असतं का?
अन् सोप्पं जे दिसतं ते, प्रेम असतं का?

कधी कधी उगीच ते, मनात येउन बसतं
पण चुकूनही तिच्या ते, जवळपास नसतं
सुंदर सुंदर पोरींवर ते, रुसतं का?
प्रेम कधी सोप्पं, असतं का?

उगीचच्या उगीच ते, चित्र काढत राहतं
हजारो ते रंग अन्, त्यात भरत राहतं
मग मध्ये उगीचच ते, पुसतं का?
प्रेम कधी सोप्पं, असतं का?

कधी ते इथे अन्, कधी ते तिथे
जिथे जिथे यौवना ते, घुटमळतं तिथे
सांगा सभ्य मुलाला हे, बरं दिसतं का?
प्रेम कधी सोप्पं, असतं का?

काळे काळे भोर ते, ढग बनून येतं
थेंब थेंब कधी कधी, धो धो बरसतं
तिच्या घरच्या रस्त्यातंच, साचतं का?
प्रेम कधी सोप्पं, असतं का?

नको तिथे जातं अन्, वाटेल ते करतं
लगाम मी लावला तर, अजून वेडं होतं
अभ्यासाच्या मध्ये असं, सुचतं का?
प्रेम कधी सोप्पं, असतं का?

नको नको वाटतं पण, तरी हवे असतं
जितकं मिळत असतं त्यात, समाधान नसतं
हवं ते मिळून कोणी, रडत बसतं का?
प्रेम कधी सोप्पं, असतं का?

- ॐ

प्राण तळमळे

शुक्र, ०४/०३/२००५ - १७:३४

प्राण माझा तळमळे हो प्राण माझा तळमळे

वेदनांची सावली सोडावयाची पाठ ना
धावुनी उपयोग ना
भाग्य अन् दुर्भाग्य माझे साथ माझ्या का पळे
प्राण माझा तळमळे

चूक माझी काय होती काय होता हो गुन्हा
जिंकुनी हरलो पुन्हा
हस्तरेखा बुजत नाही का बरे बाहूबळे
प्राण माझा तळमळे

देखिले जे स्वप्न ज्याची खूप केली कामना
वेड ज्याचे मन्मना
ते नसे भाळी असे आधीच मज का ना कळे
प्राण माझा तळमळे

वक्र ज्या मार्गावरी मी अर्पिले तनमनधना
अर्थ ना त्या जीवना
वाहत्या अश्रूंतुनी सर्वस्व माझे ओघळे
प्राण माझा तळमळे

-ओंकार

अर्जुन, शकुनी अन मराठी माणूस

बुध, ०२/०३/२००५ - १९:०९.
मराठी माणूस मागे पडतो कारण पुढे जाण्यासाठी फक्त बुद्धी पुरत नाही. लागतो धूर्तपणा, चाणाक्षपणा.ही कविता आयुष्यात अर्जुन बनू पाहणार्‍या मराठी माणसासाठी...

भर दुपारी रणात
राहुनी उभा मी वाळूत
विचार करतो मनात
संभ्रमित

रोज इकडे मी उभा
उमले कधी माझी प्रभा
कधी भरेल युद्धसभा
प्रतीक्षतो

ध्येय होते बनू पार्थ
ध्येयामागे राहिला स्वार्थ
सन्धिहि नाही पुरुषार्थ
दाखविण्या

धमक जी गान्डीवात
सज्ज पार्थाच्या हातात
येइना ती उपयोगात
कृष्णाविना

कृष्ण होता अवतार
निराकारास तो आकार
नियतीवरी अधिकार
गाजवितो

सूर्य स्वबळे झाकितो
सहस्र सोळा राखितो
भगवद्गीता सांगितो
उभ्या उभ्या

म्हणे धर्मराजही थोर
स्वजनांवरी तो कठोर
अन्यायापुढे कमजोर
वर्षे किती

नव्हता तो अन्याय
सोडला ना पर्याय
खेळामध्ये ज्याने पाय
धरविले

शकुनीचे ते नैपुण्य
लोकां वाटे वैगुण्य
असती हे पापपुण्य
सन्कल्पना

पार्थ नित्य विद्यार्थी
युधिष्ठिर तो धर्मार्थी
शकुनी फक्त ध्येयार्थी
दोष काय

पार्थ हे कष्टाचे फळ
नैपुण्य असे ना दुर्मिळ
मानतो जे बुद्धीबळ
शकुनीत

खेळ नियतीचा खेळतो
दान आपुले ठरवितो
दैवालाही वळवितो
स्वकौशल्ये

युद्धाआधी पराभूत
पांडव अज्ञातवासात
युद्ध कृष्णाने भारतात
योजियले

कृष्ण करेल उद्धार
अपेक्षा ही व्यर्थ फार
घेतसे एकदाच अवतार
युगांमध्ये

नाही कृष्ण नाही युद्ध
पार्थ सुद्धा हतबुद्ध
विजयी तो ध्येयबद्ध
शकुनीच

- ओंकार

अजूनही

बुध, ०२/०३/२००५ - १२:०५

अजूनही ती येते सोफ्याच्या हातावर बसते
अजूनही ओढणी तिची तो सुगंध मजला देते
अजूनही तो हात तिचा माझ्या केसांतुन फिरतो
अजूनही पोटावरती मी गाल तिच्या घासतो

अजूनही संगणकावरती काम मि करतो माझे
अजूनही खुर्चीमागे अस्तित्व जाणवे तिचे
अजूनही या गळ्याभोवती रेशमाचि कर-मिठी
अजूनही सुखस्पर्शाच्या त्या गोष्टी अवती भवती

अजूनही कुडकुडणार्‍या या थंडीमध्ये फिरतो
अजूनही थरथरणर्‍या मी कवेत तिजला घेतो
अजूनही खांद्यावर माझ्या विसावते प्रेमाने
अजूनही ती सुखावते मग उष्णहि उच्छ्वासाने

अजूनही मी करतो काही प्रयोग पाककलेचे
अजूनही ती करते सारे श्रेय जरी ते माझे
अजूनही लुडबुड माझी ती प्रेमभराने बघते
अजूनही गोडवा तिचा ती चवीमध्ये उतरवते

अजूनही फटका माझ्या या हातांवरती बसतो
अजूनही नकळत जेव्हा मी नखेच ही कुरतडतो
अजूनही अपशब्द मिसळतो शब्दांमध्ये जेव्हा
अजूनही ते वटारलेले दिसती डोळे तेव्हा

अजूनही रात्री निजताना जवळ उशाशी बसते
अजूनही ती आवेगाने कुशीत माझ्या शिरते
अजूनही सप्नांमध्ये ती धुंद धुंद बागडते
अजूनही प्रात:काली ती हळुच मला जागवते

अजूनही ती विरघळलेली गात्रांमध्ये माझ्या
अजूनही मधुगंध तिचा दरवळे भोवती माझ्या
अजूनही मी प्रयत्न करतो अलिप्त अस्तित्वाचा
अजूनही बाष्पीभुत होतो, रोज लढा जगण्याचा

- ओंकार
कविता - अजूनही