Sunday, January 04, 2009

अधिर

पळभर तुला पाहतो
विव्हळत मनी राहतो
जवळ सखे अलगद ये
सुखवत अधिर हृदयाला

लाजुन मधुर तू दिसता
धडधड किती धडधडते
गडद भुरे नयन हिरे
लपवत अधिर हृदयाला

मखमल जणू गाल तुझे
अवखळ हास्य सांडती
अधर सुखे स्पर्शात हे
भिजवत अधिर हृदयाला

कोमल कृष्ण कुंतल ते
नकळत श्वास धुंदवती
तनुवर जे पसरुनिया
बिलगत अधिर हृदयाला

(ही कविता चालीवर बांधलेली असल्याने वृत्तबद्ध नाही)

विरह

शब्द हरवले आज साजणी जवळी तू नसता
स्तब्ध मी एकाकी बसता

आठवणी त्या गोड क्षणांच्या किती चिती भरल्या
मला ज्या क्षणोक्षणी स्मरल्या

वेळ कोणती कुठे चाललो कसे कळेना गे
जाहलो खराच वेडा गे

प्रेम करावे कसे, शिकावे तुझ्याकडून सखे
जे कधी नसे कुणासारखे

तुझ्याचसाठी ओघळले जे हळूच मी पुसले
लपवले तरी तुला दिसले

आज मिठीतुन निघता वाटे तोल सावरेना
सखे गे परतुनि तू ये ना

शब्द कुठे हे गेले

शब्द कुठे हे गेले माझे
शब्द कुठे हे गेले

डोळ्यांमधले भाव वाचता
सांगत असता तसेच बहुदा
पाझरून ते गेले माझे
शब्द कुठे हे गेले

चमचमणाऱ्या कर्णफुलांचे
मोहक हसणे पाहुन बहुदा
मोहरून ते गेले माझे
शब्द कुठे हे गेले

डोळ्यांमधली मादक सुंदर
सलज्ज थरथर पाहुन बहुदा
शहारून ते गेले माझे
शब्द कुठे हे गेले

सुरेख नाजुक माळ गळ्यातिल
नितळ कांतिवर अशी विलसता
हरखूनच ते गेले, माझे
शब्द कुठे हे गेले

सखी साजणी पाहुन माझी
प्रेमफुलांची चादर बहुदा
पांघरून ते गेले, माझे
शब्द कुठे हे गेले

असे काय झाले

असे काय झाले, मला ना कळाले
कसे तास मिनिटाप्रमाणे पळाले

किती वादळे पाहिली सोसली मी
कसे धैर्य श्वासांमध्ये हे गळाले

मनासारखे वागणारे हृदय हे
स्वतःहून का आज कोणा मिळाले

मला राहवेना कुणा पाहवेना
कसे गारव्याने किनारे जळाले

असे गोडसे स्वप्न माझे, कळेना
जपू या कसे मी, असे वेगळाले

कवी

केल्या कितीक गझला ना भावल्या कुणाला
या भावना मनाच्या ना समजल्या कुणाला

हृदयात तोच ठेका परि का मनात हेका
ज्या स्पंदल्या कधी त्या का कोंदल्या कुणाला

हा वेग स्पंदनांचा आवेग भावनांचा
धाराहि आसवांच्या ना थांबल्या कुणाला

जाणीव ना तरी का मातीस नांगराची
रुतल्या जरी कळा या ना बोचल्या कुणाला

झालो जरी अगस्ती प्राशूनि सागराला
लाटा जरी स्वतःच्या या जागल्या कुणाला

क्षणमात्र मात्र रुसवा आहे उगाच फसवा
'ॐकार' भाग्यरेषा या लाभल्या कुणाला

नकळे मजला

चैन का नसे नकळे मजला
काय सखे हे झाले मजला

जेथ पाहतो तेथ तू दिसे
प्रेम-आंधळे केले मजला

चंद्र रात्रिचा दिवसा उगवे
ऊन चांदणे दिसले मजला

गारवा इथे गारवा तिथे
काय तुजकडे ढकले मजला

प्रेम असे तू दिले घेतले
हर घटकेस सुखवले मजला

नाही

आज असता तू इथे कसलीच मजला भ्रांत नाही
पण तरी चंचल किती हे हृदय माझे शांत नाही

काय होता स्पर्श तो बेभान होतो जाहलो मी
आठवांच्या संगतीने मन उगाच निवांत नाही

चेहरा तव गोड आहे जाणले होते कधीचे
गोडवा तो चाखण्यासम गोडसा दृष्टांत नाही

रेशमी पाशात आहे आज सारे विसरलो मी
वाटते बाहूंपुढे या आज कुठला प्रांत नाही

काय हे 'ॐकार' वदसी, जाणसी का तू तरी ते
बोल माझे अनुभवाचे सांगतो, वेदांत नाही

स्वप्न

हात हा हातात आहे
काय मी स्वप्नात आहे

कोणती आहे कला ही
चंद्र ना गगनात आहे

कोठुनी आला सभोती
गोडवा गंधात आहे

टोचती ताज्या कळ्या ह्या
काय त्या स्पर्शात आहे

चेहरा नाही परी अस्तित्व
ते सगळ्यात आहे

स्वप्न आहे वाटते
उठवू नका अर्ध्यात आहे

तुझ्यामुळे

आज जीवनी अधांतरी मी तुझ्यामुळे
जाणतो न हे घडे असे का तुझ्यामुळे

वेळ चुकीची गाठलीस तू अशी कशी
ताळमेळ ना खेळ चालला तुझ्यामुळे

रात्र अमेची चांदण्यातली जुनी बरी
आज निशेचा दिवस जाहला तुझ्यामुळे

काय पाहतो काय ऐकतो इथे तिथे
आवडे जरी तरी न स्मरते तुझ्यामुळे

खोदतो उगाच खोल खड्डे इथे पुन्हा
आज जुन्यावर नवीन जखमा तुझ्यामुळे

वाट चालताच वाटते वाट लागली
तरी पुन्हा मी तुझ्यासमोरी तुझ्यामुळे