Thursday, November 25, 2021

पाऊस ज्याचा त्याचा

पा

ऊ 

स 

ज्याचा त्याचा



पानावरती टपटप पडती, थेंब टपोरे बागडती 

ऊन त्यावरी दिसते मोहक, कुणी लुटे आनंद किती 

सगळ्यांचे पण असे नसे 


पाणी गळते छपरामधुनी, वारा न जुमाने भिंती 

ऊब हरवते घरातली अन मनात राहे फक्त भिती

सगळ्यांचे पण असे नसे


पाटामधुनी खळखळ पाणी, बहरुन आलेली शेती 

ऊस उभा जोमात वाढतो, कुणास दिसते श्रीमंती

सगळ्यांचे पण असे नसे 


पात्रामध्ये नदी न मावे, सागरास येते भरती 

ऊर फोडुनी टाहो करती, कुणी तिथे छपरावरती  

सगळ्यांचे पण असे नसे 


पाय थिरकती नशेत झुलती, कोसळत्या धारांवरती

ऊत येइ बीभत्सपणाला, कुणी बाटली करी रिती

सगळ्यांचे पण असे नसे


पायवाट चिखलाची जाता, कपड्यांवर नक्ष्या बनती

ऊर्मीने भरलेल्या छोट्या, कुठे मस्त होड्या पळती

सगळ्यांचे पण असे नसे


पाऊसच तो सर्वांसाठी, भावना निराळ्या चित्ती

ऊर्ध्वेकडुनी धारा येती, हसती रडती अन सरती

सगळ्यांना भिजवून असे 



  • ओंकार कऱ्हाडे ७/३०/२०२०

Wednesday, November 24, 2021

रंगुनी रंगात साऱ्या - अमेरिकेतल्या मराठी माणसाची गझल

 रंगुनी रंगात साऱ्या - अमेरिकेतल्या मराठी माणसाची गझल

© Omkar Karhade


रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा 

इकडचे गोरे नि काळे रंग माझा सावळा 


पश्चिमेचा वेष यांचा पश्चिमी भाषा तशी

चालण्या अन बोलण्याचा ढंग माझा बावळा


बाह्यरंगी सरळ साधी चाकरी अन भाकरी 

अंतरंगी पाहता मज अंतरी नाना कळा 


आपले मी मानिले हो ख्रिसमसालाही इथे 

आणि हॅलोवीनसाठी आणिला मी भोपळा 


हरितरंगी कार्ड येण्या लागली वर्षे जरी 

लाभल्या दिवसात माझा मांडतो मी सोहळा 


-ॐ