Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts

Sunday, September 11, 2011

Technology

गेले निघोनि मित्र पडलेत ओस कट्टे
ऑर्कूट फेसबुकवर हाय् बाय रोज होते

सुचतील काय गप्पा, प्रत्यक्ष भेट होता
संपून विषय गेले, परवाच चॅट करता

हिरवे कुणी नि लाल, स्टेटस कुणास पिवळे
अदृश्य ते कुणी हो, लपण्यात धन्य झाले

आले मनात काही, झाले क्षणात पोस्ट
प्रत्यक्ष बोलण्याचे घ्यावे कशास कष्ट?

डोळ्यामधील भाव, खांद्यावरील हात
नसता कशा विणाव्या गाठी मनात घट्ट?

या नेटने जगाला का आणिले समीप
हे बंध रेशमाचे लोटीत दूर खूप

Sunday, July 03, 2011

निरोप कायमचा - गझल

आता भेटू नको पुन्हा तू निरोप देतो कायमचा
दिलास तितका त्रास पुरे मी निरोप घेतो कायमचा

प्रेम कसे झाले, फुलले, कळले न कधी मजला तेव्हा
क्षणिक सुखाच्या मागे सगळा गुंता होतो कायमचा

नाती, गोती, जाती, पाती बनल्या भिंती फक्त तुला
नव युगातही अडाणीपणा रक्त शोषतो कायमचा

वचन दिले अन वचन घेतले वजन राहिले ना शब्दा
प्रेमामधल्या आठवणींचा चोथा उरतो कायमचा

परिस्थितीला ठरवुन दोषी, अशी कशी सुटशील सखे
लढल्याविन जो हरतो पश्चात्तापी झुरतो कायमचा

Thursday, June 16, 2011

अशात भेटलो कुठे - गझल

मी जुन्या मला अशात भेटलो कुठे
मस्त जीवना अशात भेटलो कुठे

भावना मनात ठेवल्या नि कोंदल्या
मुक्त अंबरा अशात भेटलो कुठे

कूपमंडुका समान खुंटली मती
भव्य सागरा अशात भेटलो कुठे

गोंधळात कर्म वेंधळी, कटु फळे
शांत निर्झरा अशात भेटलो कुठे

राहिला न धर्म, भक्तिभाव लोपला
देव मंदिरा अशात भेटलो कुठे

नोकरीत व्यस्तता नि व्यस्तता घरी
धुंद पाखरा अशात भेटलो कुठे

मज कसे कळेल निस्तरायचे कसे
कारणास आरशात भेटलो कुठे

-ॐ

Tuesday, May 05, 2009

जुळवून घे

जे मिळाले ते गुमान लवून घे
या जगाशी घे पुन्हा जुळवून घे

ओळखीचे राहिले नाही कुणी
आरशापुढला दिवा विझवून घे

वाट प्रगतीची कधीची खुंटली
घोंगडे पाण्यामध्ये भिजवून घे

तोकड्याचे दुःख कुठले वाहते
धाकल्याचेही जरा उसवून घे

योजनांमधली हवा गेली जरी
कल्पनांचा तू फुगा फुगवून घे

कौल हृदयाचा कुणी का ऐकतो
तर्कबुद्धीने मना फितवून घे

राहणे 'ॐकार' कसले रे इथे
चांगले म्हणुनी मला फसवून घे

Sunday, January 04, 2009

अधिर

पळभर तुला पाहतो
विव्हळत मनी राहतो
जवळ सखे अलगद ये
सुखवत अधिर हृदयाला

लाजुन मधुर तू दिसता
धडधड किती धडधडते
गडद भुरे नयन हिरे
लपवत अधिर हृदयाला

मखमल जणू गाल तुझे
अवखळ हास्य सांडती
अधर सुखे स्पर्शात हे
भिजवत अधिर हृदयाला

कोमल कृष्ण कुंतल ते
नकळत श्वास धुंदवती
तनुवर जे पसरुनिया
बिलगत अधिर हृदयाला

(ही कविता चालीवर बांधलेली असल्याने वृत्तबद्ध नाही)

विरह

शब्द हरवले आज साजणी जवळी तू नसता
स्तब्ध मी एकाकी बसता

आठवणी त्या गोड क्षणांच्या किती चिती भरल्या
मला ज्या क्षणोक्षणी स्मरल्या

वेळ कोणती कुठे चाललो कसे कळेना गे
जाहलो खराच वेडा गे

प्रेम करावे कसे, शिकावे तुझ्याकडून सखे
जे कधी नसे कुणासारखे

तुझ्याचसाठी ओघळले जे हळूच मी पुसले
लपवले तरी तुला दिसले

आज मिठीतुन निघता वाटे तोल सावरेना
सखे गे परतुनि तू ये ना

शब्द कुठे हे गेले

शब्द कुठे हे गेले माझे
शब्द कुठे हे गेले

डोळ्यांमधले भाव वाचता
सांगत असता तसेच बहुदा
पाझरून ते गेले माझे
शब्द कुठे हे गेले

चमचमणाऱ्या कर्णफुलांचे
मोहक हसणे पाहुन बहुदा
मोहरून ते गेले माझे
शब्द कुठे हे गेले

डोळ्यांमधली मादक सुंदर
सलज्ज थरथर पाहुन बहुदा
शहारून ते गेले माझे
शब्द कुठे हे गेले

सुरेख नाजुक माळ गळ्यातिल
नितळ कांतिवर अशी विलसता
हरखूनच ते गेले, माझे
शब्द कुठे हे गेले

सखी साजणी पाहुन माझी
प्रेमफुलांची चादर बहुदा
पांघरून ते गेले, माझे
शब्द कुठे हे गेले

असे काय झाले

असे काय झाले, मला ना कळाले
कसे तास मिनिटाप्रमाणे पळाले

किती वादळे पाहिली सोसली मी
कसे धैर्य श्वासांमध्ये हे गळाले

मनासारखे वागणारे हृदय हे
स्वतःहून का आज कोणा मिळाले

मला राहवेना कुणा पाहवेना
कसे गारव्याने किनारे जळाले

असे गोडसे स्वप्न माझे, कळेना
जपू या कसे मी, असे वेगळाले

कवी

केल्या कितीक गझला ना भावल्या कुणाला
या भावना मनाच्या ना समजल्या कुणाला

हृदयात तोच ठेका परि का मनात हेका
ज्या स्पंदल्या कधी त्या का कोंदल्या कुणाला

हा वेग स्पंदनांचा आवेग भावनांचा
धाराहि आसवांच्या ना थांबल्या कुणाला

जाणीव ना तरी का मातीस नांगराची
रुतल्या जरी कळा या ना बोचल्या कुणाला

झालो जरी अगस्ती प्राशूनि सागराला
लाटा जरी स्वतःच्या या जागल्या कुणाला

क्षणमात्र मात्र रुसवा आहे उगाच फसवा
'ॐकार' भाग्यरेषा या लाभल्या कुणाला

नकळे मजला

चैन का नसे नकळे मजला
काय सखे हे झाले मजला

जेथ पाहतो तेथ तू दिसे
प्रेम-आंधळे केले मजला

चंद्र रात्रिचा दिवसा उगवे
ऊन चांदणे दिसले मजला

गारवा इथे गारवा तिथे
काय तुजकडे ढकले मजला

प्रेम असे तू दिले घेतले
हर घटकेस सुखवले मजला

नाही

आज असता तू इथे कसलीच मजला भ्रांत नाही
पण तरी चंचल किती हे हृदय माझे शांत नाही

काय होता स्पर्श तो बेभान होतो जाहलो मी
आठवांच्या संगतीने मन उगाच निवांत नाही

चेहरा तव गोड आहे जाणले होते कधीचे
गोडवा तो चाखण्यासम गोडसा दृष्टांत नाही

रेशमी पाशात आहे आज सारे विसरलो मी
वाटते बाहूंपुढे या आज कुठला प्रांत नाही

काय हे 'ॐकार' वदसी, जाणसी का तू तरी ते
बोल माझे अनुभवाचे सांगतो, वेदांत नाही

स्वप्न

हात हा हातात आहे
काय मी स्वप्नात आहे

कोणती आहे कला ही
चंद्र ना गगनात आहे

कोठुनी आला सभोती
गोडवा गंधात आहे

टोचती ताज्या कळ्या ह्या
काय त्या स्पर्शात आहे

चेहरा नाही परी अस्तित्व
ते सगळ्यात आहे

स्वप्न आहे वाटते
उठवू नका अर्ध्यात आहे

तुझ्यामुळे

आज जीवनी अधांतरी मी तुझ्यामुळे
जाणतो न हे घडे असे का तुझ्यामुळे

वेळ चुकीची गाठलीस तू अशी कशी
ताळमेळ ना खेळ चालला तुझ्यामुळे

रात्र अमेची चांदण्यातली जुनी बरी
आज निशेचा दिवस जाहला तुझ्यामुळे

काय पाहतो काय ऐकतो इथे तिथे
आवडे जरी तरी न स्मरते तुझ्यामुळे

खोदतो उगाच खोल खड्डे इथे पुन्हा
आज जुन्यावर नवीन जखमा तुझ्यामुळे

वाट चालताच वाटते वाट लागली
तरी पुन्हा मी तुझ्यासमोरी तुझ्यामुळे

Wednesday, May 07, 2008

किती वाट पाहू

किती वाट पाहू किती वाट पाहू
तुझी ही अशी मी किती वाट पाहू

जसे दाटती मेघ आकाशरानी
हवा कुंद गाई जणू मूकगाणी
कसा धुंद मी मुक्त हा श्वास घेऊ
किती वाट पाहू किती वाट पाहू

जशा सागरी येत लाटा दुरूनी
किनारी ध्वनी तोच तो येई कानी
किती घट्ट मी कान दाबून ठेवू
किती वाट पाहू किती वाट पाहू

दिसे कामिनी चेहरा का दिसेना
करी स्पर्श जो हात तोही दिसेना
कसा चित्र अस्पष्ट रेखीत जाऊ
किती वाट पाहू किती वाट पाहू

जसा तोषितो मेघ तृष्णा धरेची
करी सांगता खिन्नते रिक्ततेची
कधी स्वप्न सत्यात गे हेहि पाहू
किती वाट पाहू किती वाट पाहू

Saturday, March 01, 2008

शब्दकोडे (Marathi crossword 1)

1 2 3 4 5
1
2
3
4
5

शोधसूत्रे : अ , ब म्हणजे वरून अ व्या रांगेतल्या डावीकडून ब व्या चौकोनात शब्दाची सुरुवात
आडवे शब्द
१,१ पोटी भीती घेऊन हे दोन्ही उडणारे (५)
२,१ तुझ्यात द्वितियेचा आला प्रत्यय, हा पाण्याने भरला (३)
२,४ शंका ही उलटवता सारी, आसक्तीच्या आहारी (२)
३,३ विनम्रतेतही शंभरदा, झोक कशात जातो सदा (३)
४,२ दिन उलटव व कोरडा हो की तूप असे लागेल (३)
५,१ हे करू की ते करू की, यमाला दोन घुमवून देऊ (५)
उभे शब्द
१,१ पोहणे एका किड्याचे, ही आली की ब्रेक पकडायचे (४)
१,२ आडदांड चांगला मोठा भाऊ (५)
१,३ वायव्येचे हे होते राजे, अर्जुनाने यांचे वाजवले बाजे (३)
१,५ सदसद्विवेकबुद्धीमधुनी जलविचार गेला पळुनी (२)
२,४ (उलटवून) या ठिकाणी मागे जाता वळणांवर कुडकुडते (४)
३,५ झिंगलेला नाही अशी मुग्धता (३)
४,३ एक इंग्रजी अक्षर (२)

उत्तरे

Sunday, December 02, 2007

भाषा आणि लैंगिक भेदभाव

काल सायंकाळी बायकोबरोबर घराजवळच्याच एका मॉल मध्ये गेलो होतो. तिथे जेवणाचा आस्वाद घेताना शेजारच्या टेबलाकडून एक दोनेक वर्षाची (माझ्यामते) मुलगी (माझ्यामते) धावत आली आणि आमच्या टेबलाशेजारी उभी राहिली. दिसायला एकदमच गोड होती आणि अमेरिकन असूनही आमच्याकडे बघून अगदी हसत खिदळत होती. नाहीतर बहुतांश अमरू बाळे एकदम गोबरी गोबरी पण मख्ख असतात. ट्रेनच्या डब्यात अमरू बाळ असेल तर त्याच्या आई वडिलांखेरीज कुणालाही फारसे कळत नाही पण देसी किंवा चायनीज बाळ असेल तर ते शेजारच्या डब्यात पण कळते.

असो, तर सांगायचा मुद्दा हा की ही गुंड मुलगी आमच्या शेजारी येऊन उभी राहिली आणि आम्ही तिची सोबत एंजॉय करत होतो. एवढ्यात तिचा बाप (माझ्यामते) कुठूनसा आला आणि त्याने अमेरिकन शिष्टाचाराप्रमाणे त्या मुलीच्या वतीने 'एक्स्क्यूज अस' म्हटले. तोही हसतमुख होता त्यामुळे आम्हाला फारसे ओशाळल्यासारखे झाले नाही. इथे देशातल्याप्रमाणे लहान मूल दिसले आणि तुम्ही १ मिनीट थांबून सहज खेळलात असे करता येत नाही, म्हणजे सभ्यपणाचे समजत नाहीत. त्या मुलाचे आई-बाप तुमच्याकडे 'हा मायकेल जॅक्सन पंथातला तर नाही' अशा नजरेने बघतात. आता एवढे सगळे घडल्यावर ती मुलगी किती गोड आहे हे तिच्या बापाला सांगणे ओघाने आलेच. आणि यावेळी गाडी लिंगभेदावर अडकली - ती खरच मुलगीच आहे ना, की मुलगा (की अजून काही चा प्रश्न तूर्तास बाजूला ठेवू). माझ्या तोडक्या मोडक्या इंग्रजीला ताण देऊन 'तो' किंवा 'ती' यांचा उल्लेख टाळून वाक्य बनवायचा प्रयत्न केला पण छे! बर त्या बापाला विचारावे की ही मुलगी आहे की मुलगा, तरी जरा कसेनुसेच वाटते. शेवटी एक स्माइलसे मामला निपट दिया.

आता तो/ती गोड होता/होती सांगायला लिंग माहित असण्याची काय गरज होती. पण नाही, ते माहित असावे लागते. अबक आंबा खातो/खाते हे सांगायला अबक चे लिंग माहित असावे लागते. अबक ला शाळेत प्रवेश घेताना जात दाखवावी लागते तशातलाच प्रकार. अबक दूध पितो या वाक्यात अबक पुंलिगी असल्याचे तर कळते पण अबक कुत्रा, बोका की गणपती यांपैकी काय ते कळत नाही. म्हणजे भाषेला पुंलिंग स्त्रीलिंगी मध्ये भेद करण्याची गरज इतर गोष्टींहून जास्त वाटते. आहे की नाही आश्चर्य. भाषा भाषांमध्ये हा फरक थोड्याफार फरकाने जाणवतोच.

आता भाषा-भाषांच्या गमती बघा. मराठीमध्ये तो/ती पिझ्झा खातो/खाते, म्हणजे सर्वनाम आणि क्रियापदात भेदभाव. पण तेच नकारार्थी वाक्यामध्ये तो/ती व्यायाम करत नाही म्हणजे नकारार्थीसाठी जास्त समानता. हिंदीमध्ये 'वह चारा खाता/ती है और रबडी नहीं खाता/ती' म्हणजे सर्वनामात किंवा होकारार्थी नकारार्थी मध्ये फरक नाही पण क्रियापदात आहे. इंग्रजीत 'ही/शी ड्रिंक्स बीअर बट डझ नोट ड्रिंक वॉटर' म्हणजे सर्वनाम सोडून बाकी सगळे तसेच (टल्ली). फ्रेंच मध्ये म्हणे सर्वनाम, विशेषण, क्रियापद सगळेच बदलते.

कदाचित हे फरक त्या त्या समाजाचा स्त्री पुरुषांकडे बघण्याचा दृष्टीकोन दाखवतात. हजारात एक संदर्भ असा असतो की ज्यात स्त्री पुरुष फरक कळेल. जसे - अबक गरोदर आहे. त्यासाठी सरसकट सगळ्या क्रियापदांना वेगळे वागवणे थोडे अचंबाकारक आहे. अर्थात याचे श्रेय बऱ्याच वर्षांपूर्वी ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्या भाषा बनवल्या त्यांना जायला पाहिजे. असेही म्हणता येईल की जेव्हा भाषांचा उगम झाला तेव्हा स्त्री पुरुष यांच्या संबंधांशी निगडित क्रिया आणि अन्नशोध यांचाच प्रभाव असल्याने 'हजारात एक' च्या ऐवजी 'दोनात एक' असेल. पण विकसित समाजातही असा बदल दिसतो. जसे 'स:/सा कन्दमूलानि खादति' या फक्त सार्वनामिक बदल असणाऱ्या भाषामातेच्या पोटी 'तो/ती भाकरी खातो/खाते' एवढा मोठा फरक असणारी भाषा जन्मली. या एका फरकात त्या काळच्या सामाजिक परिस्थितीमधील बदलाचा बराच मोठा प्रभाव जाणवतो.

तर एकूण काय, उगीच अनोळखी माणसांच्या पोरांना 'गोड' वगैरे म्हणण्याच्या भानगडीत पडू नये हेच खरे.

Sunday, November 18, 2007

चकवा

का असे घडते इथे, कळले कधी का ना मला
मार्ग जो चोखाळला त्याने दिला चकवा मला

पौर्णिमेच्या चांदण्याची पाहतो का वाट मी
द्वादशीचा चंद्रही नाही कधी दिसला मला

वाळवंटी वाढलो अन् सागराला भेटलो
पोहणे सोडाच, ना आले कधी भिजता मला

रूप बदले, रंग बदले मी स्वत:ला शोधतो
आरश्याचा चेहरा म्हणतो कधी सरडा मला

चपलता आता पुरे 'ओंकार' पळण्या अंत ना
झाकुनी डोळे उभा, आतातरी पकडा मला

ओंकार कर्‍हाडे

प्रकाशित मनोगत दिवाळी अंक

Sunday, August 19, 2007

गूगर्लशी लग्न

असं वाटायला लागलेय की गूगर्लशी माझे लग्न झालेय. जबरदस्ती नाही पण राजी खुशीने पण नाही. बालविवाह म्हणावा तर तसे पण नाही कारण आजकाल लहान लहान कार्टीपण मला अंकल म्हणायला लागली आहेत. पुनर्विवाह म्हणावा तर तोही नाही कारण माझ्या बायकोची काहीच हरकत नाहीये - गूगर्लला; पुनर्विवाहाला नाही. तसे म्हटले तर तिचेही झालेय. आणि वाचकांपैकी अनेक मंडळीपण, बोटातल्या अंगठीशी खेळत होकारार्थी माना डोलावत असतील.

लग्न झाल्यावर जी पहिली गोष्ट जाते ती म्हणजे प्रायव्हसी. दोन जीव जेव्हा पावणे दोन, दीड, सव्वा असे हळू हळू तन मन धनाने एक होत असतात तेव्हा प्रवास सोपाच असेल असे नाही. डोक्याला डोके भिडते जिथे,... तिथे टेंगुळ पण येऊ शकते. प्रेमविवाहात कदाचित जास्त सोपे असेल कारण त्यात सुई टोचण्या आधी प्रेमाचे स्पिरिट लावलेले असते, पण स्पिरिट किती पटकन उडून जाईल हे कुणी सांगा. पण या लग्नात हा प्रवास अगदीच अलगद होतो.

गूगर्ल शोधावर सर्वात आधी आम्ही फिदा होतो. ०.००२ सेकंदात ३४५२३ शोध. वा वा.. ! जे टाइप करायला आम्ही १० सेकंद घेतले त्याचा शोध एवढ्या लवकर. भलतीच कामसू हो! मग आम्ही भिका मागून मागून गूगर्ल मेल वर खाते उघडतो. खाजगी, सामाजिक, आर्थिक अशी आमची सगळी पत्रे तिला देतो. ती लाडिकपणे म्हणते - "मी ना... तुमची सगळी येणारी जाणारी पत्रे वाचेन पण त्यांचा उपयोग फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच करेन... मग देता ना परवानगी". आम्ही बेधडकपणे हो म्हणतो आणि पत्रांबरोबर तिने फुकट आणलेल्या आमच्या आवडत्या (म्हणजे तिच्याच आवडत्या हो...) जाहिराती बघतो. गूगर्लला मराठी कळत नाही पण तरी ती पत्रे वाचते आणि बिनधास्त काहीच्या काही जहिराती माथी मारते. एरवी, असले नसते उद्योग करणारीने चांगल्या शिव्या खाल्ल्या असत्या पण आम्ही म्हणतो वा काय हुशार आहे ही. "प्रेम असते आंधळे, बहिरे मुके, वेडे पिसे" याचाच प्रत्यय आम्ही घेत असतो पण तोही नकळत.

प्रत्यक्ष भेटण्याचा आम्हाला भारी कंटाळा म्हणून गूगर्ल आमचे निरोप पोहोचवते आणि आणते. गूगर्ल म्हणते "तुम्ही किनई, विसराळूच आहात" आणि आमच्या दिनदर्शिकेचा ताबा घेते. आमची कागदपत्रे हरवतील या भीतीने सांभाळते. आमच्या मनातले वदवून घेऊन ब्लॉगरवर प्रकाशित करते. आमची छान छान छायाचित्रे, चलचित्रे इ. पाहिजे त्या लोकांपर्यंत पोहोचवते. मित्रांना शोधते, भेटवते. रस्ते शोधते. गुंतवणुकीची माहिती सांगते. बातम्या सांगते. वस्तू शोधून विकत घेऊन घरी पोहोचवते. आम्ही शास्त्रज्ञ झालो तर पेपर्स पेटंट्स हुडकते, डॉक्टर झालो की पेशंट्स हुडकते. थोडक्यात म्हणजे आमच्यासाठी काय वाट्टेल ते करते. तेही विनातक्रार आणि फुकट. आम्ही तिला राब राब राबवतो आणि मग एके दिवशी शोध लागतो की आम्ही तिच्यावर पार अवलंबून झालो आहोत.

अशा लग्नाला काय म्हणायचे. आमचे चालणे, बोलणे, वागणे सगळेच तिला माहित आहे पण तिच्या अस्तित्वाचा शोध आम्हाला आता लागतोय. तसा आमचा तिच्यावर विश्वास नाही अशातला भाग नाही पण आहे म्हणायला आम्ही तिला फारसे ओळखतच नाही. आम्हाला वाटते की ती आमच्या तालावर नाचते पण खरेतर आमच्या तालाचा एकन् एक ठोका तिला माहित झालाय. आजकाल ती आम्ही न सांगताच नाचते पण आणि आम्ही कौतुकही करतोय.जगभरच्या असंख्य लोकांचे ताल हिला माहित आहेत आणि त्यावर नाचण्याची किमया हिला जमतेय; आणि हीच बाब तर खटकतिये. ही जगवधू बनतियेउगीचच पूर्वीच्या काळी असलेल्या विषकन्या वगैरेंची आठवण झाली. राजांना मोहवून त्यांच्याकडून गुप्त माहिती उकळणे आणि मग 'खल्लास'. बाप रे!!!

चला, आता मी रजा घेतो. या सुविधेला किती उपभोगायचे आणि मग किती भोगायचे ते तुम्हीच ठरवा. बाकी माझा लेख पहा माझ्या गूगल ब्लॉग वर http://omkarkarhade.blogspot.com/

Tuesday, June 19, 2007

सुट्टीचे प्लॅनिंग

सुट्टी!! लहानपणीपासून आतापर्यंत केवढया सुट्ट्या आल्या आणि संपल्या पण मला आठवते ते म्हणजे सुट्ट्यांचे 'प्लॅनिंग'. अचाट, अफाट, सुसाट अशा शेकडो टकारांती योजना आम्ही बनवत राहिलो आणि मी तरी अजूनही बनवत आहे. आजच्या पिढीला आधी हे सांगायला हवे की सुट्टीचे प्लान म्हणजे चित्रकलेचा वर्ग, कराटेचा वर्ग, व्यायामाचा वर्ग आणि वर्गमुळात काही नाही असा नसायचा. आणि हापूसच्या आंब्याला लाजवेल एवढ्या चवीने हा चाखला जायचा. परीक्षा जवळ आलेल्या आहेत, अभ्यासाची बोंब लागली आहे, सर्वविषय-वासनांचा वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्याग झालेला आहे, कोणते धडे यावेळी मानगुटीवर बसले आहेत हे शोधण्याची धडपड चालू आहे अशी परिस्थिती. नापासांची चिंता करणार्‍या चाटेंचे दर्शन घ्यावे लागण्याइतपत वाईट अवस्था नसली तरी वर्गातली थोडी अब्रू जपणे तर भाग होतेच. आता टवाळक्या पुरे, आता फक्त अभ्यास. अर्जुनाच्या एकाग्रतेने मी पोपटरूपी अभ्यासावर नेम धरायचो. अभ्यास एके अभ्यास. माझ्या त्या एकाग्रतेने आणि निष्ठेने इंद्रालाही आपले स्थान डळमळीत झाल्यासारखे वाटायचे बहुदा. आणि लगेच 'सुट्टी' नामक अप्सरेची माझ्या बालमनाला भुरळ घालण्याच्या कामी नियुक्ती व्हायची. घरात, रस्त्यात, शाळेत, मैदानात कुठेही ही अप्सरा प्रकटायची आणि आईचा राग, रस्त्यातला खड्डा, सरांचा खडू किंवा एखादे जोरदार "आउट" तिला बाद करेपर्यंत ती पिच्छा पुरवायची.

मनाला भुलवणारे सुट्टी रंग तरी किती वेगवेगळे. कधी आई, बाबा, तहान, भूक इ.इ. सगळे थोपवून अख्खा दिवस खेळायला मोकळा. त्यात पूर्णवेळ माझी बॅटिंग चालू आहे. मी तडातड फटके मारतोय आणि सीमापार गेलेला चेंडू इतर मुले विनातक्रार आणताहेत. इमारतींच्या काचा चेंडूप्रूफ झाल्यात आणि खालच्या मजल्यावरचे वसकणारे पिल्ले अंकल आंटी आमचे जप्त केलेले सगळे चेंडू परत करून कौतुकाने खेळ बघताहेत. वा वा वा! किती मजा. कधी समोरच्याला संधी न देता कॅरमच्या सगळ्या सोंगट्या मी घालवतोय तर कधी पतंगाने वटवाघुळांना पळवतोय. हे जरा विचित्र वाटतेय ना पण लहानपणी माझ्या सुट्टीच्या प्लान मधे ही एक अजब गोष्ट नेहमी असायची. त्याचे असे होते की आमच्या इमारतीवरून रोज मावळतीनंतर संधिप्रकाशात वटवाघुळांचा मोठा थवा (?) पश्चिमेकडून पूर्वेकडे उडत जायचा. पतंगाने वटवाघुळांना भिववायचा मी बराच प्रयत्न करायचो पण हे बेटे कधी घाबरतील तर शप्पथ. दिवस मावळल्यावर वारे पण पडायचे आणि पतंगही त्यामुळेही बेत फसायचा. याशिवाय विज्ञानाचा अभ्यास करताना आमच्या बालवैज्ञानिकामधला बाल झोपायचा आणि वैज्ञानिक एडिसनने लावले नसतील एवढे दिवे लावायचा.

सुट्टीचे प्लानिंग असे झोपेत जागेपणी उठता बसता चालायचे. शहाण्या मुलासारखा रोज लवकर उठून व्यायाम करायचा असे संकल्पही व्हायचे. रात्र थोडी सोंगे फार अशी प्लानिंगची गत होते ना होते तोच परीक्षांचा दिवस उजाडायचा. घोडा मैदान दिसताच सुट्टी आमची रजा घ्यायची. अभ्यासाची अन् परीक्षांची रणधुमाळी चालू झाली की तहान भूक हरपून मी युद्ध करायचो. भरपूर वेळ असला तर खुलेआम मैदानात नाहीतर हा प्रश्न ऑप्शनला टाक, तो धडा गाइड मधून वाच असा गनिमी कावा वापरायचा. भवानीमातेच्या आशीर्वादाने कधी तोंडघाशी पडू दिले नाही. पुन्हा एखाद्या आठवड्यात एवढा अभ्यास केल्यावर एकदम ज्ञानी झाल्याचा साक्षात्कार व्हायचा आणि पेपर चांगला गेल्यावर विषय आवडू बिवडू लागायचा. घरी पण जरा जास्तच लाड चालू असायचे परीक्षेच्या काळात. कधी नव्हे ते बाळ अभ्यास करतोय तर जेवण खाण एकदम बसल्या जागी, अभ्यासाच्या खोलीच्या आजूबाजूला खास शांतता. वा वा...! अशा प्रकारे परीक्षा संपत आली की अभ्यासाबद्दलचे प्रेम भलतेच जागृत व्हायचे. आणि एके दिवशी परीक्षा संपायची.

आजवर मला कधीही कळले नाहिये का पण आजवर परीक्षेच्या नादात सुट्टीचे प्लानिंग पार धुऊन निघालेय. हम ये करेंगे वो करेंगे म्हणणारे नेते कसे निवडून आले की सुस्तावतात तसे परीक्षा झाल्यावर व्हायचे. भरपूर झोपण्याचा पहिला प्लान पहिल्याच दिवशी मोडीत निघायचा. गजर वाजण्याआधीच जाग. दर परीक्षेनंतर त्या परीक्षेचे सामान आवरणार्‍या आईने शेवटच्या परीक्षेचा ढीग आमच्यावर सोपवलेला. कालपर्यंत आवडणार्‍या अभ्यासाचे आज दर्शनही नकोसे होत असताना त्या ढिगाकडे ढुंकूनही पाहणे नकोसे झालेले असायचे तेव्हा तो आवरणे हे अगदीच अप्रिय होऊन जायचे. गावी जाणे हा एकमेव प्लान तिकिटे काढून झाल्याने निश्चित असायचा पण त्यालाही पुष्कळ अवकाश असायचा.

एकूण काय तर पहिलाच दिवस अगदी डब्बा व्हायचा आणि सुट्टीपेक्षा प्लानिंगच बरे असे म्हणावे वाटायचे.

Thursday, June 07, 2007

उद्या

का 'उद्या'साठीच जागा 'आज'ला नाही कुठे
काळ वाहे, धावुनी त्या गाठला नाही कुठे

रोजच्या काबाडकष्टा ज्या 'उद्या'ची प्रेरणा
रम्य अन् असतो उद्या, तो भेटला नाही कुठे

कर्म करण्याचाच प्रण केला, फळे ना चाखली
वृक्ष तो वठला तरीही, छाटला नाही कुठे

गुंतलो, हा खेळ कसला, खेळवे ना सोडवे
का कधी हा द्यूतक्रीडा वाटला नाही कुठे?

हे प्रभो, तू घेतला का हात होता अखडता
झोळणा मज हातचा तर फाटला नाही कुठे.