"रोज रोज काय मजेशीर! बस झाले आता विनोदी लेखन. इथे एवढे गंभीर प्रश्न पडलेत दुनियेपुढे आणि तुम्ही काय लिहिताय तर विनोदी..." मी आरशातल्या मला समजावले. आणि शेजारचा दिवा विझवला. मागच्या महिन्यातल्या पृथ्वी-दिवशी मी ऊर्जा-बचतीचा संकल्प केला होता तो अजूनही मी उत्साहाने राबवत होतो. शेवटी स्वरूप पाहिल्याशिवाय विश्वरूप कसे दिसणार - दहावीत असताना विनोबा असे काहीसे म्हणाले होते. असो, तर सांगायचा मुद्दा हा की या वैश्विक प्रश्नामागे मी हात धुऊन लागलो आहे.
त्याच सुमारास असे वाचले की २०२१ पर्यंत उष्मा एवढा वाढेल की पूर आणि दुष्काळामुळे बांगलादेश आणि भारत आदि देशांवर गंभीर संकट ओढवणार आहे. त्याचे मुख्य कारण असणारे अमेरिकेत होणारे अमर्याद प्रदूषण. बापरे! मी जरा घरातच इथे तिथे पाहिले. दोन संगणक चालू, तीन चार बल्ब, दोन ट्यूबा, शीतकपाट आणि चार्जरला एक मोबाईल. डोळेच बाहेर आले माझे. विजेचे बिल सपाट म्हणजे भाड्यातच सामावलेले असल्याने पैशाची काही चिंता नव्हती आणि म्हणूनच ही उधळपट्टी चालू होती. मग ठरवले की आजपासून सुधारायचे.
जळणारे दिवे पाहून सहजच गझल आठवली - ’मालवून टाक दीप - चुप’ पुढच्या ओळीने चित्त विचलित व्हायच्या आधीच गुणगुणणे थांबवले आणि घरातले सगळे उगीच जळणारे दीप मालवून टाकले। जरा अंधार वाटायला लागला पण त्या अंधारात मला उद्याच्या उषःकालाची बीजे दिसत होती. बल्ब बघितले तर सगळे १०० वॅटचे. कुणीतरी घर सोडून जाताना दिले होते आणि फुकट म्हणून बिनदिक्कत जळत होते. "अमरू संस्कृतीची कृपा" असे म्हणून मी मनातल्या मनात दोन चार शिव्या देऊन घेतल्या. इथे घरात ट्यूबा नसतात, असली तर फक्त स्वयंपाकघरात. पांढरा प्रकाश काम करताना आणि पिवळा प्रकाश आराम करताना असा काहीतरी अजब फंडा. त्यामुळे नवीन नवीन असताना घरात नाही तर बार मधे बसल्यासारखे वाटायचे. तसे अमरू लोक घरांमधे पीतवर्ण प्रकाशात पीत बसण्याशिवाय फारसे काही वेगळे कुठे करतात.
बल्ब पण भिंतीवर न लावता उंच उंच खांबांवर लावतात. या बल्बांची बटणे देखील चमत्कारिक असतात. समजा उजवीकडे बटण फिरवल्यावर दिवा लागत असेल तर कुठचाही डोके न फिरलेला माणूस दिवा बंद करायला बटण डावीकडे फिरवेल की नाही, पण ते उजवीकडेच फिरवावे लागते. पंख्याचे तर त्याहून अजब. एक साखळी असते जी एकदा खेचली की पंखा ३ वर, दुसर्यांदा खेचली की २ वर, आणि असेच चौथ्यांदा खेचली की बंद. पंख्याचा वेग हा हळू, अतिहळू आणि महाहळू असा अनुक्रमे ३, २ आणि १ साठी असतो. अहो पण म्हणून बिघडतं कुठे, वातानुकूलन असतेच की. पण इथेच तर खरी गोम आहे. आमची इमारत थोडी जुनी आहे त्यामुळे वातानुकूलकातून सहा महिने गरम आणि सहा महिने थंड हवा येते. तापमान नियंत्रण नाही. त्यामुळे थंडी किंवा गरमी या दोन्हीने मरायचे नसेल तर वा.कु. चालू करायचा, पंखा चालू ठेवायचा, खिडकी किंचित उघडायची आणि खिडकीपासून ठराविक अंतरावर झोपायचे, बस! आहे की नाही सोपे. एकूण काय तर विजेचा चुराडा.
पण आता मात्र मी ठरवले की हे सगळे थांबवायचे. तडक कपडे बदलले आणि ट्युबा आणायला निघालो. ऊर्जा वाचणार आणि घराचे बारपण जाऊन घरपण येणार म्हणजे एका दगडात दोन पक्षी! मी स्वतःवरच खूश झालो. खाली गेल्यावर जाणवले की थंडी बरीच जास्त आहे. म्हणून सायकलचा विचार सोडला व बस पकडली. नैसर्गिक वायूचे का होईना थोडेसे प्रदूषण झालेच. दुकानात पोहोचल्यावर लक्षात आले की ट्यूबा लावायला आधी भिंतीवर खिळे ठोका आणि थोड्या तारेवरच्या कसरती (वायरींग) करणे गरजेचे आहे ज्यासाठी इमारत व्यवस्थापनाची परवानगी लागते. च्या***, मी भाषिक स्वातंत्र्याचा उपभोग घेत मोकळेपणाने राग काढला. आता मी मोर्चा ऊर्जा वाचवक बल्बांकडे वळवला. ५ डॉलरला १ !!! म्हणजे ६ बल्बांचे ३० आणि बेसिनच्या वरचे बल्ब धरून ५० डॉलर!!! माझ्या निर्धाराची धारच गेली. आता एकच घेऊ आणि बघू चालतोय का व्यवस्थित अशी काहीशी फुटकळ सबब बनवून एक घरी आणला. आणल्या आणल्या त्याच्या शुभ्र चांदण्याने घर न्हाऊ घालण्याचा मोह काही आवरला नाही आणि तडक सगळे दिवे मालवून एक दिवा काढून ठेवला व नवीन लावला. खटॅक - बटण दाबताच सर्पिलाकार बल्ब मधे जीव आला आणि त्याकडे बघण्याचा गाढवपणा करणार्या माझ्या डोळ्यासमोर तारे चमकले. मिटलेल्या डोळ्यांसमोर बराच वेळ त्या सर्पिलाकार उजेडाची निगेटिव दिसत होती. हळू हळू मी डोळे उघडले. काऽऽऽऽऽऽय? पिवळा प्रकाश? खोक्यावर तर लिहिलेय सॉफ्ट व्हाइट म्हणून. तो दिवा डिफेक्टिव असावा म्हणून परत केला आणि तो तसाच पीतप्रकाशी असतो कळल्यावर त्याचा नाद सोडला.
इथे ही दिवेलागणी होत असताना घरात जमलेल्या हजार प्लास्टिकच्या पिशव्यापण खुणावत होत्या। इतका कचरा फक्त आपल्या घरातून जमतो आणि अशी करोडो घरे असतील. आता हा कचरा कमी केलाच पाहिजे. उद्यापासून प्लास्टीक च्या पिशव्या दुकानातून सामान घेताना नाकारायच्या. पहिल्या मोहिमेत चांगलाच फटका बसल्यावर जरा सोपेच ध्येय घेतले होते. पण कळपाच्या विरुद्ध जाणे कठीणच असावे. कारण इथेही लगेचच दैवाचे फासे फिरले. दुकानात नेहमीप्रमाणे ८-१० पिशव्या मिळाल्या. मी अगदी उत्साहाने त्यातले सगळे सामान ३ पिशव्यांमधे बसवले. एक मोठी पिशवी घरून आणलीच होती. उत्साहात पैसे वगैरे देऊन घरी आलो आणि दुसर्या दिवशी लक्षात आले की पिशव्या वाचवायच्या गडबडीत एक सॉसची बाटली वाचवलेल्या पिशवीतच गचकली होती.
देव परीक्षा पाहतो ती अशी असावी पण अजूनही उत्साहाने काही बाही करणे चालू आहे. थोडे आव्हान, थोडी मजा आणि थोडे सत्कृत्य करताना बरे वाटते एवढेच.
Saturday, May 12, 2007
Subscribe to:
Posts (Atom)