आज कविता सोडून काहीतरी दुसरे लिहिण्याचा मूड आलाय. दुसरे काही म्हणजे गद्य. पुलं म्हणतात त्याप्रमाणे गद्य नाही ते पद्य आणि पद्य नाही ते गद्य हे अगदी खरेय. असो. आधी बराहा.कॊम चे आभार. त्यांनी जरा लिहायची सोय केलीये मराठीतून. असो.
विचार अगणित आहेत त्यामुळे सुरुवात करणे जरा कठीणच. म्युन्सिपाल्टीच्या मजुराला "जा, रस्त्यावरचे खड्डे बुजव" असे सांगितले, तर तो जसा बुचकळ्यात पडेल तशी काहीशी अवस्था आहे. रस्त्यावरून आठवले, ट्रॉलीत (शाळेची बस) बसून दररोज हजार धक्के खाताना देशातले रस्ते बरे असे वाटत राहते. आणि देशात याच्या उलट वाटते हे सांगणे न लगे. "यू हॅव प्लेंटी ऑफ कंप्लेंटी, इट्स युवर स्वभाव", एक इंग्रजाळलेला मित्रवर्य स्व भाव खात सांगतो. बसमधे बसून धक्के न लागून घेणे हे आपल्या बस मधे नसले तरी तो स्वभावाचा भाग कसा बनतो देव जाणे.
अमेरिका म्हटले की आपल्या डोळ्यासमोर तरळतात उंच उंच इमारती अन त्यांच्या काचांइतकेच गुळगुळीत रस्ते. रस्त्यात पाहाल तर प्रतिबिंब दिसेल. पण प्रत्यक्षात मात्र चालताना रस्ता न पाहाल तर प्रतिबिंब बघणेबल राहणार नाही. तसे म्हटले तर इथल्या म्युन्सिपालट्या कायम हा ना तो रस्ता दुरुस्त करतच असतात, त्यामुळे रस्त्यावरून जाताना सगळ्या लेन्स वाहनांसाठी मोकळ्या असणे कठीणच. अजस्र वाहने, जी ऑटोमॅटिक रस्ता बनवतात आणि त्यांच्या बाजूला एक पोलिसकाका हे दृश्य अगदी नेहमीचे आहे. इथल्या पोलिसकाकांना लोक जाम घाबरतात. पोपटी जॅकेट आणि त्यावर मोठ्या अक्षरात पोलिस असे लिहिलेले हे नमुने रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून चित्र विचित्र हातवारे करत असतात. आणि गाड्या शांतपणे इथून तिथून ये जा करत असतात. बसमधे बसून मी निरीक्षण करत असतो आणि शांतपणाने चाललेल्या या गर्दीत विचार करतो. कुठे हॉर्न नाही कुठे गोंगाट नाही कौतुकास्पदच.
तसा अमेरिकन माणसांचा समंजसपणा, एकमेकांविषयीचा आदर हे एक कोडेच आहे. इमारतीचे दार उघडणारा माणूस मागच्या व्यक्तीच्या अंगावर ते बंद होऊ नये म्हणून पकडून ठेवतो, रस्त्यावर अनोळखी माणूसही हाय करतो पण हाच अमेरिकन बसमधे पसरून बसला की दोन जागा खातो आणि हालतही नाही. त्यांची बससंस्कृती जरा वेगळी असावी. इअरफोनचे दोन बोंडुक कानात टाकून बसभर ऐकू येईल एवढ्या आवाजात गाणे लावले असताना त्याच्या मेंदूकडून अजून काही अपेक्षा करणेही तसे गैरच म्हणा. पण यांचे कर्ण कवचकुंडले घालूनच जन्मत असावेत, कारण जवळपास प्रत्येक अमरू आपल्याहून हळू आवाजात बोलतो अन ऐकलेले समजतो पण.
इथे सरकारी बशींचा/ट्रेन्सचा वापर तसा कमीच. विद्यार्थीवर्ग, गरीब-गुरीब अमरूजन आणि देशी-चायनीज कर्मचारीवर्ग यांचा प्रामुख्याने भरणा. बाकी सगळे कारसेवा करण्यातच पुण्याई मानणारे आणि रोज वाढणार्या कोंडीच्या आणि गॅसच्या भावाच्या नावाने खडे फोडणारे. आवळलेल्या टायमधून प्रदूषण आदि कल्पना यांच्या गळी उतरवणे कठीणच. कधी-कधी यांच्या पर्यावरण-जागृतीविषयक कल्पना पण अचाट असतात - आता परवाच पृथ्वी-दिवस साजरा झाला आमच्या शाळेत. त्यात एक उपक्रम राबवला तो असा - प्रत्येकाने एका पृथ्वी-दिवस कूपन चे प्रिंटाउट काढायचे आणि ते रिसायकल पेटीत टाकयचे. वाह! मान लिया इनको. यांना सांगितले की शक्यतो एका कारमधून अनेक जण एकत्र प्रवास करा तर हे ऑफिस मधून एकट्याने आल्यावर घरच्यांना घेऊन पुन्हा छोटी चक्कर मारून येतील.
असो. तर एकूण काय - घरोघरच्या चुली मातीच्या नसल्या तरी भाकरीचा प्रवास खडतरच.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment