Thursday, April 26, 2007

शरण्य सबमिशन

आता हा माउस कुठे ठेवायचा असे म्हणून थोड्या कागदांचे दुसरीकडे पुनर्वसन करण्याचा मी प्रयत्न केला पण एक कागद सरकताच दुसऱ्याने त्या जागेवर अतिक्रमण केले. त्या भानगडीत माझे लक्ष गुंतल्याचे पाहून एका पेन्सिलीने टेबलावरून उडी मारून आत्महत्येचाही प्रयत्न केला. पुस्तके वगैरे दांडगट मंडळी माझ्या झटापटीला दाद देत नव्हतीच. पण मधेच कळफलकाच्या कडा सर करून नसत्या कळा दाबून विरोध व्यक्त करत होती. त्यांचा एका हाताने कळफलकावरून कडेलोट केला तर त्या धक्क्याने कोपर्‍यातले पुस्तकांचे डोलारे डोला रे डोला रे करायला लागले. परिस्थिती हाताबाहेर जायला लागली आणि एफ् एम ने सुरात सूर मिसळला "इन्किलाब झिन्दाबाद".

माझे धाबे दणाणले होते. सामानांचा असामान्य लढा चालू होता माझ्याविरुद्ध, तोही असहकाराच्या शांततामय मार्गाने. लगेच मागल्याच आठवड्यात आणलेल्या "गांधी विरुद्ध गांधी" च्या सीडीला हुडकले, अपेक्षेप्रमाणे टेबलावरच सापडली. लगेच तिची रवानगी जमिनीवर केली. मी पण काही ऐकणार नव्हतो. तसा माझा भुता-प्रेतांवर विश्वास नव्हता, ना घडणार्‍या घटनांच्या अर्थपूर्णतेवर. पण आल्या परिस्थितीला तोंड देणेही भागच होते. अजूनही माउस शेपटीच्या बळावर टेबलावरून खाली लटकत होता. स्पीकर वगैरे बिनमहत्त्वाची मंडळी अजून खोक्यातच लपून होती. नव्या संगणक सेलेरॉन नसून सायमन आहे असा मला भास व्हायला लागला.

"भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे .. - कंग्रॅज्युलेशन्स! यू हॅव वन अ फ्री आय-पॉड नॅनो". आशाबाईंच्या निराशामय गाण्यामध्ये किरकिर्‍या आवाजातल्या उपटसुंभ जाहिरातीने माझी चांगली झोपमोड केली. मगाशी लटकणाऱ्या माउसला, त्याची शेपटी गालाखाली घेऊन मी जो आधार दिला होता त्याचे वळ गालावर उमटले होते. "गांधी वि. गांधी" याची सीडी आणि डबा यांनी टेबलाच्या पायथ्याशी विरुद्ध दिशेत झेप घेतली होती. डोळे किलकिले करून पाहिले तर समोर अर्धवट टाइप झालेला रिपोर्ट तसाच माझ्याकडे आ वासून पाहत होता. आणि भिंतीवरचे घड्याळ मला दोन्ही हात जोडून नमस्कार करत होते. काय? बारा? xxxx. अजून प्रेझेंटेशनची तयारी उरलिये.

ही आहे विद्यार्थी"दशा". कायम काहीतरी "ड्यू" असणे आणि ते जिवाचा आटापिटा करून वेळच्या वेळी सबमिट करणे ही "ड्यूटी". आणि सबमिशन म्हणजे शरण जाणे. या दोन शब्दांचे उगम असे असतील हे आता मला कळले. जुलूम जबरदस्तीने वेळेच्या मागे धावत राहण्याचे शिक्षण असे चालूच राहते. कधी कुणाचे बघून लिही, कधी कामे वाटून घे, त्यातूनही स्वतःचे वेगळेपण जप असे प्रकार करत करत विद्यार्थीदशा माणसाला घडवत जाते. आणि त्यातूनच घडतात किंवा बिघडतात आपल्या आजूबाजूची माणसे. अवास्तव अपेक्षांचे मोठे ओझे वागवण्याची आणि त्याविषयी तक्रारी करत राहण्याची एवढी सवय होते की त्या स्वतःहून निर्माण केल्या जातात. अशी माणसे स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य याच चक्रात भरडत राहतात. उदाहरणार्थ आमचे शिक्षक चेंग, हे टोपणनाव नाही चिनी नाव आहे, ज्यांच्या वर्गात उद्या आमचा ’निक्काल’ लागणार आहे.
------

"आमच्या वेळी किती अभ्यास होता माहितिये का? १५-१५ पौंडांचे एक एक पुस्तक होते", चिनी पुस्तकाबद्दल, चिनी ढंगात, जवळपास चिनीच वाटणार्‍या इंग्रजीत त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा ऐकवले. त्या पुस्तकांचा वापर करायला माझे हात शिवशिवत होते. काल रात्रीची झोप बदले की आग में सारखी डोळ्यांवर चाल करून येत होती. त्यातून ३० वर्षांपूर्वीच्या चिन्यांच्या चुकांची उजळणी, आजच्या खंद्या तरुण पिढीला पुन्हा एकदा झोपवत होती. "आजचे प्रेझेंटेशन ३०% चे आहे याची आठवण करून देऊन स्वतः शेवटच्या बाकावर विराजमान झाले".

१-२ मिनिटांच्या खटपटीनंतर प्रोजेक्टर पेटला व आमच्या भविष्यातला अंधकार कमी झाला. एकेका स्लाइड वरून घसरत धन्यवाद पर्यंत पोहोचलो आणि हुश्श केले. "कुणाला काही प्रश्न असतील तर..." (कुणाला म्हणजे चेंगसरांना, जशास तसे न्यायाने मुले तर नेहमीच सर्वज्ञ असतात.) असे म्हणून मी चेंडू पेंगणार्‍या चेंगच्या पुढ्यात ढकलला. पण ही चेंगपेंग खूपच दिक्भूलक ठरली. माझ्या सरपटी रबरी चेंडूच्या उत्तरात त्यांनी सीझनच्या चेंडूने एकावर एक उसळते प्रश्न टाकले. सगळेच नो बॉल पण पंचांच्या गोलंदाजीने सगळे अंदाज गोल करून टाकले.

आणि नहमीप्रमाणे दुखापतीने हैराण असे आम्ही पुढच्या सामन्याची तयारी करायला परतलो.

No comments: