Wednesday, August 23, 2006

तिला मला...

शुक्र, १८/०८/२००६ - २१:४१

सगळे कळे तिला अन् सगळे कळे मला
शब्दात तीक्ष्ण काटे खुपले तिला मला

संवाद पाकळ्यांचे खुडले कुठून गेले
मधुरात्र भंगताना दिसले तिला मला

या कोरड्या जगाला का वेदना कळाव्या
अश्रूंबरोबरी या टिपले तिला मला

वाट्यास ना मिळाव्या थोड्या निवांत घटिका
का व्याप वाटताना गुणले तिला मला

पण बंध रेशमाचे सुटणार हे कधी ना
ना गाठ बांधली पण विणले तिला मला

Sunday, August 13, 2006

रजा

रवि, ०६/०८/२००६ - २०:००

रोज पहाटे, उठता वाटे, तांबडे फुटे का?
मोडते स्वप्नांचा झोका

मधुर गजर वा टिटिटि असो, कर्कश्य भासतो का?
वाटते घड्याळास ठोका

गजर दाबला, पडदे मिटले, कान सोडले का?
बांग त्या मशिदीची ऐका

उठलो कधिही तरी, रोज हा उशीर होतो का?
बॉसला थाप नवी फेका

रजा रजा अन् रजा रजा मन रजा मागते का?
'र'जाता निजे स्वस्थ 'ॐका'

-ॐकार

नरक

सोम, २४/०७/२००६ - ०९:२६

स्तब्ध रात्री त्या अचानक झोप माझी मोडली
देव वदला प्रकटुनी की लीज़ (lease) माझी संपली

थबकलो, काही कळेना, घर्मबिंदू चमकले
यमदुता दुरुनीच यामाहा वरी मी पाहिले

संपले, कळले मला, पळुनी तरी जाऊ कुठे
घेउनी मजला वरी, मोटार आकाशी उठे

पोचलो, उड्डाण करुनी, भव्य मोठ्या दालनी
लोचनी सामावल्या ना दालनीच्या लायनी

तिष्ठलो, मी जाळले साडे सहा घंटे कसे
आसने ना मासिके, टी. व्ही. वरी काही नसे

लागला अंती कधी नंबर कुण्या खिडकीमधे
'अप्सरा - बी.कॉम.' खोटे गोडसे हसुनी वदे

फॉर्म भरले शेकडो, केल्या हजारो चौकशा
तीन पडले गुण कमी, नरकाकडे वळल्या दिशा

जाउदे, स्वर्गात धनिकांचेच चाले तेवढे
अप्सरांचे लाड आम्हाला कुठे हो परवडे

काहिसे घडले अचानक, परत भू वर सोडले
"वाढली आरक्षणे नरकामधे", मी ऐकले

-ॐ

झुरळे

शनि, ३०/०७/२००५ - २३:३३

येथे नव्या दमाने, ही धावणार झुरळे
मारा किती कशीही, ही राहणार झुरळे

ओटा बने पटांगण, भांडे सुरेख मंच
जोशात भाषणे गुपचुप ठोकणार झुरळे

आबालवृद्ध जमती, जाती भरून भिंती
सारे मिळून खाती, ना भांडणार झुरळे

ही रक्तवर्ण सेना, मागे कधी हटेना
पिळदार ना मिशा पण, ना हारणार झुरळे

जरि रोज रात्रपाळी, रविवार मेजवानी
बेगॉनच्या नशेने, ही धुंदणार झुरळे

(झुरळग्रस्तगृहत्रस्त) ॐ

(निरोप)

रवि, १७/०७/२००५ - १३:२८

मूळ गझल: मनोगतावरची निरोप ही गझल जी आता मला सापडत नाहीये :(

गडे तुझी याद येत राही क्षणाक्षणाला
तुझ्याविना 'वजन' काय आहे जगावयाला

अरे सासर्‍या निघून गेलास तू अवेळी
दिली सोडुनी हिला अशी का 'फुलावयाला'

पुन्हा जिव्हारी 'भुकंप' झाले जुन्या स्मृतींचे
पुन्हा अशी धावु लागली ही पहावयाला

'पुरेल' मज जन्मभर सखे ही तुझी 'ग्रोसरी'
नकोत अजुनी नवीन आहार खावयाला

निरोप घेतो अखेरचा दोस्तहो पुन्हा मी
निघे न भीता पलंग माझा रचावयाला

का सखे का...

गुरु, १४/०७/२००५ - ०१:५४

का सखे का प्रेम हे मेघावरी केले उगा
श्रावणाचा दोष तो, नाही कुठे झाला दगा

बरसला तो, बरसणे हे काम, त्याचे नेमके
कोरडी झालीस आता, बोल त्याला शेलके?

कालचा जो सावळा, तो आज आहे उजळला
त्या दिलेल्या सप्तरंगा, ना तरी तो विसरला

प्रेम, असते आंधळे बहिरे मुके वेडे पिसे
जागते ना झोपते, तुजला जसे, त्याला तसे

मान्य तुजला बंधने, आकाश त्याला मोकळे
पण कुठेही नेतसे वारा, तुला का ना कळे?

आजही तो वाहतो अन् शोधतो चारी मिती
काय तुजला माहिती, झुरला किती, उरला किती?

मी बोलणार नाही

शुक्र, ०८/०७/२००५ - ११:५२

रुसवा उगाच लटका "मी बोलणार नाही"
प्रेमात ऐकतो का? "मी बोलणार नाही"

ही रात धुंदलेली, हा श्वास तापलेला
फिरवून तोंड सांगे, "मी बोलणार नाही"

तालात आज लाटा, साथीस येइ वारा
रागात सूर लागे, "मी बोलणार नाही"

खुडली कितीक पुष्पे, देवीस वाहिली त्या
ना.. "क्यूट, गोड"... काही, "मी बोलणार नाही"

अपराध काय झाला? का तारखा विसरल्या?
काही विचारले की, "मी बोलणार नाही"

डोळ्यात पाहता मी, संवाद रंगले की
ओठास ओठ भिडले, 'मग बोललोच नाही'

मला काय त्याचे

गुरु, २६/०५/२००५ - ०१:४९

असे थाट शाही, मला काय त्याचे
खुळा एक हाही, मला काय त्याचे

न पांडित्य याचे, असा प्रांत कोठे
नसे मान्य काही, मला काय त्याचे

असे ते पटेना, दुरुस्ती सुचेना
कुठे तर्क नाही, मला काय त्याचे

जुनेही कळेना, नवे आवडेना
शिव्या लाख वाही, मला काय त्याचे

असे धूळ चष्म्यावरी साचलेली
म्हणे सत्य पाही, मला काय त्याचे

ढळे तोल जड हा, तनू सावरेना
तरी पीत राही, मला काय त्याचे

अनाहूत सल्ला, पुन्हा येत आहे
दिशांतून दाही, मला काय त्याचे

ब-याच वेळा...

शनि, २१/०५/२००५ - १३:३०
विडंबन (बऱ्याच वेळा ...)

दाबून भुंकण्याला, वळतो ब-याच वेळा
घालून शेपटी मी, पळतो ब-याच वेळा

अंदाज याचसाठी, बांधू नये फुकाचा
हा नेम माणसाचा, चुकतो ब-याच वेळा

दिसता दिवे कुठेही, रस्त्यावरी कडेला
साधून एक संधी, *ततो ब-याच वेळा

लावू नकोस आता, ही साखळी गळ्याला
दारामध्ये उगा मी, *गतो ब-याच वेळा

सोयीनुसार 'बांधा', सोयीनुसार 'सोडा'
शब्दातला न अर्थ, कळतो ब-याच वेळा

हे तोंड मी उघडता, धाबे दणाणते ना?
मी जांभईत मग्न, असतो ब-याच वेळा

चपला बऱ्याच मिळती, पण एक एक जोड
मागे पुढे विजोड, खुपतो ब-याच वेळा

पुतळ्यासमोर कोण्या, नमतो कधी जरासा
का गवतफूलगुच्छ, फुलतो ब-याच वेळा

-रुक्ष (ॐ)

विडंबन (पत्र लिही पण)

मंगळ, १७/०५/२००५ - ००:००

मूळ कविताः पत्र लिही पण...

पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधुनी काजळ गहिरे
लिपिरेषांच्या जाळीमधुनी
नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भुवईमधली
नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा
पूर्ण विरामाच्या बिंदूतून

नको पाठवू अक्षरांतुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातुनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा
सांगितलेः तू हट्टी पण...

पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्रच पुढचे त्यानंतर पण
वाचायाचे राहून जाते

इंदिरा संत

विडंबनः पत्र लिही पण

पत्र लिही पण काजळाविना
डाग जाइना घासल्याविना
हसायचे तर हास मोकळे
सख्या बावळ्या लाजल्याविना

वाक्य लिही पण खोडल्याविना
काना मात्रा चुकवल्याविना
ओतलीस तू विरामचिन्हे
क्षमा करी या शुद्धलेखना

शब्द अधूरे देउनी पुन्हा
नको थांबवू हृदयस्पंदना
पत्रामध्ये लिहू नको रे
कंप वात अन् अधिक वेदना

अत्तरातला गंध हा जुना
समजत नाही हुंगल्याविना
घडी मोडता कागद फाटे
कितिदा सांगू अता सुधर ना

वाच पत्र ते थांबल्याविना
समजणार ना त्रासल्याविना
पत्रच पुढचे राहुन जाते
नेहमीच का वाचल्याविना

(विडंबक) ॐ

देहाचा बाजार

रवि, १५/०५/२००५ - २२:०७

हा जुना आजार आहे
मांडला बाजार आहे

तनक्षुधा आहे असूरी
सजवला बाजार आहे

रिचवण्या हे घट सुरेचे
भिजवला बाजार आहे

लाल नेत्री आग शमण्या
नागला बाजार आहे

जीवनी बेधुंद ठेका
थिरकला बाजार आहे

दोन वेळी पोट भरण्या
जागला बाजार आहे

भावला आहे कुणा वा
झोंबला बाजार आहे

मागणीला पुरवठा हा
सरळसा व्यवहार आहे

दुःखात ना बुडालो

बुध, ११/०५/२००५ - ०१:२२

दुःखात ना बुडालो
अश्रूत ना बुडालो

केल्या टवाळक्या अन्
वचनात ना बुडालो

जवळीक ना म्हणूनी
विरहात ना बुडालो

तर्कास पूजिले अन्
रुसव्यात ना बुडालो

दृष्टीस सर्व सौख्ये
स्पर्शात ना बुडालो

बिलगूनिया सुरेला
सत्यात ना बुडालो

वर्षात चार काळ्या
प्रेमात ना बुडालो

अभियांत्रिकी शिकूनी
जगण्याविना बुडालो

-ॐ

सत्य ग्रेसाळता...

शुक्र, २२/०४/२००५ - ०३:२६

जरी भावली सभ्यता
अता क्रोशते शांतता

विनामोल, गर्तेमधे
तमाची खुले भग्नता
'उद्या'-वाळवी आज ना
नवी आजची जीर्णता

दिला प्राण हा नासका
तरी मिथ्यशी सार्थता
सुन्या गम्य मार्गावरी
झणी धावते संथता

वृथा भाव ना कोरडे
तनी सांडती स्निग्धता
इथे सप्तफेऱ्यांमध्ये
अता हासते दीनता

"असा 'ॐ' नवा जन्म हा"
फसे, सत्य ग्रेसाळता

-ॐ

तुझ्या कृपेने

गुरु, १४/०४/२००५ - ००:००

तुझ्या कृपेने कधी नव्हे ती, रोज अमावस आहे
डाव सुखाचा मोडलास तू, मनी वेदना आहे...

प्रीतिफुलांचा सुगंध होता, पुन्हा मोहरत न्यारा
तव पुष्पे कुस्करताना तू, क्रूर भासते आहे...

सुंदर मनने, नाजुक कवने, दिली घेतली वचने
कशी विसरली क्षणात गे, मी अजून स्तंभित आहे...

हृदयाच्या उघड्या दारांतुनी, धावलीस बहु माझ्या
बंद कवाडा पुढे अजूनी, तुझ्या उभा मी आहे...

पैंजणात रुमझुमलो होतो, कंकणात किणकिणलो
आज स्मृतींच्या कंकणातुनी, वीज कडाडत आहे...

तुझ्या सुखांच्या समईमध्ये, मंद मंद तेवलो
वात कोरडी, आज भोवती, तेल पेटले आहे...

"प्राक्तनात 'ॐकार', रेखिला घात, जाणवे आता"
तिचा चेहरा, घेउन छद्मी, दुःख हासते आहे...

मना नको...

रवि, ०३/०४/२००५ - ०२:५८.

मना नको मना नको नदीत टाकु नाव रे
मना नसे कधी तुला नदी प्रवाह ठाव रे
मना कधीच ऐकणार नाहि का तु सांग रे
मना नको मना नको नदीत टाकु नाव रे

मना नसेल ऐकिले तु मागच्याच वेळि रे
मना अता तरी जरा तु शाहणाच होइ रे
मना कुठे हि नाव गेलि लाग पाठि धाव रे
मना नको मना नको नदीत टाकु नाव रे

मना पुन्हा पुन्हा हि हेंदकाळतेच नाव रे
मना पुन्हा पुन्हा कसा बसे तिलाच घाव रे
मना पुन्हा पुन्हा मि सांगि दे तिला अधार रे
मना नको मना नको नदीत टाकु नाव रे

मना असा कसा तु काळजी मुळीच नाहि रे
मना बुडे पुन्हा अशी तुझीच पाहि नाव रे
मना कशास मानि दुःख त्यामध्ये उगीच रे
मना नको मना नको नदीत टाकु नाव रे

मना अता तु बैसुनी पहा नदी हि छान रे
मना तुझी तु नाव घेउनीच राख काठ रे
मना कशा अशा प्रवाह वेदना उगाच रे
मना नको मना नको नदीत टाकु नाव रे

विरहद्वेषाचे सुनीत

सोम, २८/०३/२००५ - ०१:००

महेशरावांच्या संदिग्ध प्रेमाचे सुनीततील नायकाचे पुढे काय होते ते ह्या सुनीतात वाचा.
शेवटच्या ओळींत नायक म्हणतो...
निःसंदिग्धपणे "नको" म्हणुन ती जाण्यास तेंव्हा वळे.
सारे साखळदंड पार तुटले -- वाटे कसे मोकळे!!

आणि नंतर...

आलो मी स्वघरी विचार करतो का हे असे जाहले
स्वप्नांची मज राख राख करता ना दुःख वाटे तिला
वाईटांत कधी नसेल गणना ठाऊक माझी तिला
बुद्धी रूप धनी उगाच नच मी स्वस्थान हे राखले

थोड्याश्या मग चिंतनात कळले ना दोष माझ्यामध्ये
भाग्याला धुडकावणे नि वळणे नाही असे चांगले
बुद्धीमान नि सुंदरा जगति हे संमिश्र ना जाहले
देवाची करणी असे न अपवादालाहि याच्यामध्ये

ज्ञानाने अपहार होइ विपदां हे तेधवा आकळे
थोरांचे वदणे मनात ठसणे हे फक्त हो जाणणे
थोरांचे पथ सावधानहि मने हे फक्त हो चालणे
जेथे बुद्धि नसे कठीण जगणे हे सत्य तेव्हा कळे

मागे रे बघ सुंदरा वदुनि हे स्नेही क्षणी थांबले
एका दर्शनि भाळलो नि सुनिता हासून मी फाडले

तिची भेट...

रवि, २७/०३/२००५ - ०१:००

हे दोन मित्रांमधले संभाषण. पहिला मित्र त्याच्या प्रियेला भेटून आलाय नुकताच अन् खूपच कष्टी दिसतोय. म्हणून दुसरा मित्र त्याच्या दुःखाचे कारण शोधून त्याचे सांत्वन करायचा प्रयत्न करतोय. त्याने विचारलेले प्रश्न आणि उत्तरामधला नन्नाचा पाढा यातून निर्माण झालेले हे विनोदी प्रेमकाव्य...

प्रेम घेउनी नाही आली?... नाही
सुखे घेउनी नाही आली?... नाही
असेल आलिच हसू घेउनी?... नाही
असेल आली आसु घेउनी?... नाही

अवखळ तो उत्साहहि नव्हता?... नाही
शब्द-तुटवडा भासत नव्हता?... नाही
आवाजी त्या मार्दव नव्हते?... नाही
शब्दांमाजी आर्जव नव्हते?... नाही

घेउनि आली का ती चिंता?... नाही
आली का ती होउनि चिंता?... नाही
भरली ती रागे का तुजला?... नाही
रुसवा खोटा नसेल कळला... नाही

डोळ्यांमध्ये तुझ्या हरवली?... नाही
कुशित तुझ्या ती होती शिरली?... नाही
ओठांमध्ये असेल उरली?... नाही
मिठीत होती विरघळलेली?... नाही

शब्दीं त्या तू होता ना रे?... नाही
नेत्री तरि तू होता का रे?... नाही
हास्यामध्ये असशिल वेड्या... नाही
रुसव्यामध्ये असशिल लपला... नाही

प्रश्न कसाही उत्तर तरिही "नाही"
तरी संभ्रमित झाला परि तो नाही
वदता तो अपशब्द जाहला काही
सरळ सांग ना आज ति आली नाही

मालिनी

रवि, २०/०३/२००५ - १७:३५

सतत छळत होते, वेड हे मालिनीचे
चतुर चपल का हे, चालणे मालिनीचे

भ्रमण कितिक केले, भेटण्या मालिनीला
व्यथित विरह होता, आठवी मालिनीला

विचलित अति होतो, पाहता मालिनीसी
कणभरहि न ठावे, काय हे मालिनीसी

अचल नजर माझी, न्याहळे मालिनीला
अचपल जरि ती ही, आवडे मालिनीला

थबकत बघ आली, आज का मालिनी ही
मनन मम असे हे, ऐकिते मालिनीही

प्रथम परिस झाला, स्पर्श हा मालिनीचा
सुगम सुरस झाला, संग हा मालिनीचा

(मालिनीप्रेमी) ॐ

सोप्पं प्रेम?

रवि, १३/०३/२००५ - ०१:००

प्रेम कधी सोप्पं असतं का?

प्रेम कधी सोप्पं, असतं का?
अन् सोप्पं जे दिसतं ते, प्रेम असतं का?

कधी कधी उगीच ते, मनात येउन बसतं
पण चुकूनही तिच्या ते, जवळपास नसतं
सुंदर सुंदर पोरींवर ते, रुसतं का?
प्रेम कधी सोप्पं, असतं का?

उगीचच्या उगीच ते, चित्र काढत राहतं
हजारो ते रंग अन्, त्यात भरत राहतं
मग मध्ये उगीचच ते, पुसतं का?
प्रेम कधी सोप्पं, असतं का?

कधी ते इथे अन्, कधी ते तिथे
जिथे जिथे यौवना ते, घुटमळतं तिथे
सांगा सभ्य मुलाला हे, बरं दिसतं का?
प्रेम कधी सोप्पं, असतं का?

काळे काळे भोर ते, ढग बनून येतं
थेंब थेंब कधी कधी, धो धो बरसतं
तिच्या घरच्या रस्त्यातंच, साचतं का?
प्रेम कधी सोप्पं, असतं का?

नको तिथे जातं अन्, वाटेल ते करतं
लगाम मी लावला तर, अजून वेडं होतं
अभ्यासाच्या मध्ये असं, सुचतं का?
प्रेम कधी सोप्पं, असतं का?

नको नको वाटतं पण, तरी हवे असतं
जितकं मिळत असतं त्यात, समाधान नसतं
हवं ते मिळून कोणी, रडत बसतं का?
प्रेम कधी सोप्पं, असतं का?

- ॐ

मम मनाचे श्लोक

बुध, ०९/०३/२००५ - १०:४४

मना सांग सामर्थ्य कोठे पळाले
असे पाय दैवापुढे हे गळाले
मना होय हा खेळ तूझ्या मतीचा
नसे दोष काहीच दैवी गतीचा

मना सांग शत्रू असे कोण मोठा
असे जाणि जो दोष छोट्यात छोटा
जगी त्यास धुंडाळणे व्यर्थ आहे
मना जो तुला आरशातूनि पाहे

मना तू उभा संकटांच्या समोरी
पुढे ठाकिले सर्वही शस्त्रधारी
तरी रे धरी धीर र्‍हा तू विचारी
विकारी तुझा त्यांस आधार भारी

मना सांग भीती तुला रे कुणाची
असे काय जे लाडके हारण्याची
नसे येथ काही तुझे रे स्वतःचे
उरी व्यर्थ का दुःख वाही मणाचे

मना बांधिसी बंधने रेशमाची
मना ओढ रे केवढी बंधनाची
परंतू जसे गुंतती हेच धागे
तुला रेशमाचा कसा जाच लागे

मना दाटतो भाव संवेदनांचा
मना वाटतो त्रास स्वस्पंदनांचा
मना का अश्या या खुळ्या कल्पना रे
मना फक्त नेत्रांस उघडी पहा रे

मना झोपण्याची नको तीच सोंगे
पहा दिव्यता ही प्रकाशी तरंगे
वसे तेज हे फक्त तूझ्याच आंगे
सुखे खेळ हा खेळ आनंदरंगे

- ओंकार

काव्याचे व्यसन

हे काव्य लिहिणे म्हणजे 'मौनाचा प्रचार' करण्यासारखे आहे. पण तरीही जे वाटले ते चार ओळींत उतरवले.

व्यसनातुनी व्यसनात मी का वाहतो आहे असा
व्यसनातुनी हृदयावरी उमटे असा का हा ठसा
काव्यापुढे रचनेपुढे झालो असा वेडापिसा
वाटे उगी हे काव्य माझे जीवनी या अवदसा...

ओंकार

सोम, ०७/०३/२००५ - २२:४५

प्राण तळमळे

शुक्र, ०४/०३/२००५ - १७:३४

प्राण माझा तळमळे हो प्राण माझा तळमळे

वेदनांची सावली सोडावयाची पाठ ना
धावुनी उपयोग ना
भाग्य अन् दुर्भाग्य माझे साथ माझ्या का पळे
प्राण माझा तळमळे

चूक माझी काय होती काय होता हो गुन्हा
जिंकुनी हरलो पुन्हा
हस्तरेखा बुजत नाही का बरे बाहूबळे
प्राण माझा तळमळे

देखिले जे स्वप्न ज्याची खूप केली कामना
वेड ज्याचे मन्मना
ते नसे भाळी असे आधीच मज का ना कळे
प्राण माझा तळमळे

वक्र ज्या मार्गावरी मी अर्पिले तनमनधना
अर्थ ना त्या जीवना
वाहत्या अश्रूंतुनी सर्वस्व माझे ओघळे
प्राण माझा तळमळे

-ओंकार

अर्जुन, शकुनी अन मराठी माणूस

बुध, ०२/०३/२००५ - १९:०९.
मराठी माणूस मागे पडतो कारण पुढे जाण्यासाठी फक्त बुद्धी पुरत नाही. लागतो धूर्तपणा, चाणाक्षपणा.ही कविता आयुष्यात अर्जुन बनू पाहणार्‍या मराठी माणसासाठी...

भर दुपारी रणात
राहुनी उभा मी वाळूत
विचार करतो मनात
संभ्रमित

रोज इकडे मी उभा
उमले कधी माझी प्रभा
कधी भरेल युद्धसभा
प्रतीक्षतो

ध्येय होते बनू पार्थ
ध्येयामागे राहिला स्वार्थ
सन्धिहि नाही पुरुषार्थ
दाखविण्या

धमक जी गान्डीवात
सज्ज पार्थाच्या हातात
येइना ती उपयोगात
कृष्णाविना

कृष्ण होता अवतार
निराकारास तो आकार
नियतीवरी अधिकार
गाजवितो

सूर्य स्वबळे झाकितो
सहस्र सोळा राखितो
भगवद्गीता सांगितो
उभ्या उभ्या

म्हणे धर्मराजही थोर
स्वजनांवरी तो कठोर
अन्यायापुढे कमजोर
वर्षे किती

नव्हता तो अन्याय
सोडला ना पर्याय
खेळामध्ये ज्याने पाय
धरविले

शकुनीचे ते नैपुण्य
लोकां वाटे वैगुण्य
असती हे पापपुण्य
सन्कल्पना

पार्थ नित्य विद्यार्थी
युधिष्ठिर तो धर्मार्थी
शकुनी फक्त ध्येयार्थी
दोष काय

पार्थ हे कष्टाचे फळ
नैपुण्य असे ना दुर्मिळ
मानतो जे बुद्धीबळ
शकुनीत

खेळ नियतीचा खेळतो
दान आपुले ठरवितो
दैवालाही वळवितो
स्वकौशल्ये

युद्धाआधी पराभूत
पांडव अज्ञातवासात
युद्ध कृष्णाने भारतात
योजियले

कृष्ण करेल उद्धार
अपेक्षा ही व्यर्थ फार
घेतसे एकदाच अवतार
युगांमध्ये

नाही कृष्ण नाही युद्ध
पार्थ सुद्धा हतबुद्ध
विजयी तो ध्येयबद्ध
शकुनीच

- ओंकार

अजूनही

बुध, ०२/०३/२००५ - १२:०५

अजूनही ती येते सोफ्याच्या हातावर बसते
अजूनही ओढणी तिची तो सुगंध मजला देते
अजूनही तो हात तिचा माझ्या केसांतुन फिरतो
अजूनही पोटावरती मी गाल तिच्या घासतो

अजूनही संगणकावरती काम मि करतो माझे
अजूनही खुर्चीमागे अस्तित्व जाणवे तिचे
अजूनही या गळ्याभोवती रेशमाचि कर-मिठी
अजूनही सुखस्पर्शाच्या त्या गोष्टी अवती भवती

अजूनही कुडकुडणार्‍या या थंडीमध्ये फिरतो
अजूनही थरथरणर्‍या मी कवेत तिजला घेतो
अजूनही खांद्यावर माझ्या विसावते प्रेमाने
अजूनही ती सुखावते मग उष्णहि उच्छ्वासाने

अजूनही मी करतो काही प्रयोग पाककलेचे
अजूनही ती करते सारे श्रेय जरी ते माझे
अजूनही लुडबुड माझी ती प्रेमभराने बघते
अजूनही गोडवा तिचा ती चवीमध्ये उतरवते

अजूनही फटका माझ्या या हातांवरती बसतो
अजूनही नकळत जेव्हा मी नखेच ही कुरतडतो
अजूनही अपशब्द मिसळतो शब्दांमध्ये जेव्हा
अजूनही ते वटारलेले दिसती डोळे तेव्हा

अजूनही रात्री निजताना जवळ उशाशी बसते
अजूनही ती आवेगाने कुशीत माझ्या शिरते
अजूनही सप्नांमध्ये ती धुंद धुंद बागडते
अजूनही प्रात:काली ती हळुच मला जागवते

अजूनही ती विरघळलेली गात्रांमध्ये माझ्या
अजूनही मधुगंध तिचा दरवळे भोवती माझ्या
अजूनही मी प्रयत्न करतो अलिप्त अस्तित्वाचा
अजूनही बाष्पीभुत होतो, रोज लढा जगण्याचा

- ओंकार
कविता - अजूनही