ॐ बुध, ०२/०३/२००५ - १९:०९.
मराठी माणूस मागे पडतो कारण पुढे जाण्यासाठी फक्त बुद्धी पुरत नाही. लागतो धूर्तपणा, चाणाक्षपणा.ही कविता आयुष्यात अर्जुन बनू पाहणार्या मराठी माणसासाठी...
भर दुपारी रणात
राहुनी उभा मी वाळूत
विचार करतो मनात
संभ्रमित
रोज इकडे मी उभा
उमले कधी माझी प्रभा
कधी भरेल युद्धसभा
प्रतीक्षतो
ध्येय होते बनू पार्थ
ध्येयामागे राहिला स्वार्थ
सन्धिहि नाही पुरुषार्थ
दाखविण्या
धमक जी गान्डीवात
सज्ज पार्थाच्या हातात
येइना ती उपयोगात
कृष्णाविना
कृष्ण होता अवतार
निराकारास तो आकार
नियतीवरी अधिकार
गाजवितो
सूर्य स्वबळे झाकितो
सहस्र सोळा राखितो
भगवद्गीता सांगितो
उभ्या उभ्या
म्हणे धर्मराजही थोर
स्वजनांवरी तो कठोर
अन्यायापुढे कमजोर
वर्षे किती
नव्हता तो अन्याय
सोडला ना पर्याय
खेळामध्ये ज्याने पाय
धरविले
शकुनीचे ते नैपुण्य
लोकां वाटे वैगुण्य
असती हे पापपुण्य
सन्कल्पना
पार्थ नित्य विद्यार्थी
युधिष्ठिर तो धर्मार्थी
शकुनी फक्त ध्येयार्थी
दोष काय
पार्थ हे कष्टाचे फळ
नैपुण्य असे ना दुर्मिळ
मानतो जे बुद्धीबळ
शकुनीत
खेळ नियतीचा खेळतो
दान आपुले ठरवितो
दैवालाही वळवितो
स्वकौशल्ये
युद्धाआधी पराभूत
पांडव अज्ञातवासात
युद्ध कृष्णाने भारतात
योजियले
कृष्ण करेल उद्धार
अपेक्षा ही व्यर्थ फार
घेतसे एकदाच अवतार
युगांमध्ये
नाही कृष्ण नाही युद्ध
पार्थ सुद्धा हतबुद्ध
विजयी तो ध्येयबद्ध
शकुनीच
- ओंकार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment